सारोळ्याच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 05:21 PM2018-03-24T17:21:02+5:302018-03-24T17:23:52+5:30
सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीत मल्लविद्येतील आपले कसब दाखविले.
केडगाव : सारोळा कासार (ता. नगर) येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.२३) आयोजित इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्तीत मल्लविद्येतील आपले कसब दाखविले. रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
दरवर्षी चैत्र पंचमीला यात्रोत्सव असतो. दुस-या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. त्यासाठी गावकरी लोकवर्गणी जमा करतात. या लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशांतून शुक्रवारी इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला. सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त रोख बक्षिसांचा वर्षाव मल्लांवर झाला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील मल्ल येथे आले होते. महिला कुस्तिगीर भाग्यश्री इंगळे, सोनाली मंडलिक यांनीही हजेरी लावली. ५०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. शेवटची कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे व पुणे महापौर केसरी विनोद शिंदे यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली.
आखाड्याचे समालोचन व सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, शिक्षक नेते संजय धामणे यांनी केले. पंच म्हणून तुकाराम कडूस, राजाराम धामणे, परसराम काळे, दत्तात्रय कडूस, किरण कडूस, उत्तम कडूस यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी धोंडिभाऊ कडूस, बाजार समिती निरीक्षक संजय काळे, सुभाष धामणे, फकिरातात्या कडूस, बबन तांबोळी, सुरेश धामणे, डॉ. श्रीकांत देशपांडे, राजेंद्र महांडुळे, सुरेश काळे, ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.