बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी रेल्वे मार्गाचे चुकीचे सर्वेक्षण; सलग सहाव्या दिवशी कुकाणा ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:28 PM2017-12-06T14:28:37+5:302017-12-06T14:35:04+5:30
बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी हे उपोषण सुरु असून, बुधवारी गाव बंद ठेवून चक्री उपोषण सुरु करण्यात आले.
कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी हे उपोषण सुरु असून, बुधवारी गाव बंद ठेवून चक्री उपोषण सुरु करण्यात आले.
कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्यासपीठावर हे उपोषण सुरु आहे. ब्रिटिशांनी सन १९२२ मध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. या मार्गासाठी भूमी अधिग्रहण करण्यात आले होते तसेच माती भरावाचे कामही पूर्ण झाले होते. संपादित जमिनींच्या उताºयावर रेल्वे प्रशासनाचे नाव लावण्यात आले आहे. या लोह मार्गाचा सर्वे बेलापूर-नेवासा- शेवगाव - पाथर्डी - राजुरी - रायमोह - बीड असा चुकीचा करून तो न परवडणारा असल्याचा सर्वे रिपोर्ट सादर झाल्याने मूळ रेल्वे मार्ग मागे पडला आहे. या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी बेलापूर- परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था गेली ८-१० वषार्पासून पाठपुरावा करीत आहे. परंतु या मार्गाचे काम सुरु होत नसल्याने कुकाणा येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड हे सहा दिवसापासून सहभागी झाले आहेत. या उपोषणादरम्यान खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदिंनी भेटी देऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले़ परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला कुकाणा व परिसरातील गावांनी जाहीर पाठिंबा दिला. आजपासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे.