यशवंत पंचायत राज अभियान: राहाता पंचायत समितीला राज्यस्तरासह तीन पुरस्कार
By चंद्रकांत शेळके | Published: March 7, 2024 07:00 PM2024-03-07T19:00:18+5:302024-03-07T19:00:55+5:30
१२ मार्चला नाशिकला वितरण
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ट दर्जा राखल्यामुळे यशवंत पंचायत राज अभियानात राहाता तालुका पंचायत समितीला २०२२-२३ चा राज्यस्तरीय तृतीय, तर नाशिक विभाग पातळीवर २०२०-२१ व २०२२-२३ करिता अनुक्रमे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. विभागस्तरावर या पुरस्कारांचे वितरण १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता नाशिक विभागीय कार्यालयात होणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबविल्या जातात. राज्य व विभाग स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या नाशिक विभागातील पंचायत समित्या व विभागातील जिल्हा परिषद गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे होत आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व पुरस्कार्थींना कळवले आहे. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
नगर जिल्ह्याला मिळालेले पुरस्कार
- पंचायत राज राज्यस्तर (२०२२-२३) - राहाता पं.स. - तृतीय (१५ लाख)
- पंचायत राज विभागस्तर (२०२०-२१) - राहाता पं.स. - प्रथम (११ लाख)
- पंचायत राज विभागस्तर (२०२२-२३) - राहाता पं.स. - प्रथम (११ लाख)
गुणवंत अधिकारी/कर्मचारी (२०१९-२०)
- समर्थ शेवाळे - गटविकास अधिकारी, पं.स. राहाता
- प्रदीप बर्वे - सहायक लेखाधिकारी, जि.प. अहमदनगर
- एकनाथ ढाकणे - ग्रामविकास अधिकारी, जि.प. अहमदनगर
- अशोक कदम - वरिष्ठ सहायक, जि.प. अहमदनगर (२०२०-२१)