यवतमाळच्या भाविकांचा नगर जिल्ह्यातील राहुरी येथे अपघात; ३ ठार, ८ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:39 PM2017-11-18T15:39:49+5:302017-11-18T15:54:33+5:30
साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
राहुरी (अहमदनगर) : साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
शनिवारी साईबाबांचे दर्शन करुन यवतमाळचे भाविक शनि दर्शनासाठी शिंगणापूर येथे जात होते. दरम्यान राहुरी येथे नादुरुस्त झालेला एक आयश टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचे चाक बदल्याचे काम सुरु असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेले खासगी प्रवासी वाहन (मॅक्स जीप) या टेम्पोवर आदळले. यात जीपचा चालक जागीच ठार झाला तर अन्य दहाजण जखमी झाले होते. मयत चालकाचे नाव समजू शकले नाही. पाच जखमींवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, इतर पाच जखमींना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. सुनीत गेडाम (वय २४, रा़ वणी, यवतमाळ), राजेश झुनगरे (वय ४५, रा़ वरोरा, यवतमाळ), गणेश बनसोड (वय २४, रा़ वणी, यवतमाळ), घोला पसारे (वय २४, रा़ चिंचमंडळ, यवतमाळ), अंकित सोनगे (वय १९, तुकूम, चंद्रपूर) या पाच जणांवर राहुरीत उपचार सुरु असून, त्यांनाही नगरला हलविण्यात आले. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयात डॉ़ वर्षा डोईफोडे, डॉ़ सचिन पोखरकर, डॉ़ रणसिंग यांनी जखमींवर उपचार केले.