प्रेमासाठी दीड वर्षात साडेचारशे अल्पवयीन ‘सैराट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:22 AM2018-06-28T11:22:30+5:302018-06-28T11:22:35+5:30
‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे.
अरूण वाघमोडे
अहमदनगर : ‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे. शाळा-विद्यालयात नकळत झालेले प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.
मध्यंतरी लोकप्रिय ठरलेल्या सैराट चित्रपटातील नायक-नायिकेप्रमाणे अनेक प्रेमीयुगुलांनी भूमिका अदा करत घरातून परागंदा होणे पसंत केले आहे. सुखी संसाराचे स्वप्न पाहत प्रियकराचा हात धरून पळून गेलेल्या अनेक मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत मिळून आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून पळून नेलेल्या मुलींना वाम मार्गाला लावल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. टिव्ही, मोबाईल, बाईक, पॉकेट मनी अशी भौतिक सुविधेची सर्व साधने सहज उपलब्ध होत असल्याने कोवळ्या वयात प्रेमाचे आकर्षण वाटू लागते. आई-वडील, नातेवाईक यासह भविष्याचा कुठलाही विचार न करता चित्रपटातील आभासी दृश्यांसारखे मुले-मुली थेट घरातून पळून जातात. जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना वास्तवाचे भान होते.
काही मुले-मुली परत घरी येतात तर काही जण नातेवाईकांच्या भीतीपोटी घरी न येता आहे त्या परिस्थितीत जीवन जगत राहतात. प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या मुला-मुलींचे बहुतांशी नातेवाईक समाजाच्या भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करत नाहीत. घरातील मुले-मुली पळून गेल्याने दोन कुटुंब अथवा दोन समूहात वाद होण्याच्या जिल्ह्यात अनेक घटना समोर आल्या आहेत.
शारीरिक आकर्षण़़ ...लग्नाचे आमिष
मुला-मुलींनी पौगंडाअवस्थेत पदार्पण केल्यानंतर एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण वाढून प्रेमप्रकरण सुरू होते. काही मुली या प्रेमातून सावरतात तर काही चित्रपटातील कथानकाप्रमाणे थेट घरच्यांशी बंडखोरी करून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. अनेक सज्ञान तरूण अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करतात तर कधी त्यांना पळवून नेतात. अशा अनेक घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत.
मुलींना केले नातेवाईकांच्या स्वाधीन
पळवून नेलेल्या मुला-मुलींबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. तीन महिन्यात या गुन्ह्याचा तपास लागला नाही तर ही केस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे येते. गेल्या सहा महिन्यात या कक्षाने पळून गेलेल्या व पळवून नेलेल्या नऊ मुलींना शोधून नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, भरत डंगोरे, सुनील पवार, कॉन्स्टेबल एकनाथ आव्हाड, सोमनाथ कांबळे, पोलीस नाईक रिना म्हस्के, मोनाली घुटे व रूपाली लोहाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जाती व्यवस्थेची प्रथा
बहुतांशीवेळा वेगवेगळ्या जातीतील मुला-मुलीचे प्रेम जुळते. आई-वडिलांनी या नात्याला संमती द्यावी अशी त्यांची इच्छा असते. मात्र प्रथा आणि रूढी परंपरेमुळे ग्रामीण भागात आंतरजातीय विवाहाला सहजासहजी मान्यता दिली जात नाही. अशावेळी मुले-मुली पळून जाण्याचा पर्याय निवडतात. एकमेकांमधील आकर्षण संपल्यानंतर मुलींना एकटे सोडून बहुतांशी प्रियकर फरार होतात.
८१ मुली, १५ मुलांचा पत्ताच नाही
पळून गेलेल्या अथवा पळवून नेलेल्या ३६४ पैकी २८३ अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधून काढले आहे. तर १०० पैकी ८५ मुलांना शोधण्यात यश आले. यातील बहुतांशी मुले व मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत आढळून आल्या. ८१ मुली व १५ मुलांचा गेल्या दीड वर्षात काहीच पत्ता लागलेला नाही. ते कुठे आहेत, काय करतात याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही नाही.
शाळा-महाविद्यालयात मुला-मुलीकडे पालकांनी लक्ष ठेवावे. ते खरेच शाळेत जातात का? त्यांचे मित्र कोण आहेत याची माहिती घेऊन त्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती ठेवावी. त्यांच्या मोबाईलकडे लक्ष ठेवावे, कधी शंका आली तर त्यांना समजावून सांगावे. परिणामाची जाणीव करून द्यावी. आंतरजातीय विवाहाचा विषय असेल तर दोन्ही कुटुंबांनी समजूतदारपणे हा सोडवावा. अन्यथा मुला-मुलींच्या प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनाही घडतात. हे सर्व टाळण्यासाठी पाल्यांना पालकांनी चांगले संस्कार देऊन जबाबदारीची जाणीव करून द्यावी. यातूनच अशा घटनांना आळा बसेल.
- घनश्याम पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक
पळून गेलेले, पळविलेले मुले-मुली (२०१७)
प्रकार... दाखल गुन्हे... सापडलेले... न सापडलेले
मुली...... २०७...... १७७...... ३०
मुले...... ६०...... ५४...... ६
एकूण... २६७...... २३१...... ३६
जानेवारी ते २६ जूनपर्यंत
प्रकार.... दाखल गुन्हे... सापडलेले.... न सापडलेले
मुली...... १५७...... १०६...... ५१
मुले...... ४०...... ३१...... ९
एकूण... १९७...... १३७...... ६०