संवत्सर ग्रामपंचायत कुटुंब सर्वेक्षणात ठरली अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:25 AM2021-04-30T04:25:19+5:302021-04-30T04:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी त्यांच्या संवत्सर ग्रामपंचायत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी त्यांच्या संवत्सर ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सहा दिवसात गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची तपासणी करून कोरोना प्रसार थांबविण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे.
राज्य शासनाकडून २८ एप्रिलपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत गावपातळीवर कुटुंबातील तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे; मात्र याच तारखेला संवत्सर गावाच्या यंत्रणेने सर्वेक्षण पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सरगावची लोकसंख्या सर्वात जास्त असून क्षेत्रफळदेखील जास्त आहे. त्यामुळे या गावात कोरोनाचा चांगलाच प्रसार वाढू लागला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, गट शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्यासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत २२ एप्रिलला बैठक घेतली. या बैठकीत २३ एप्रिलपासून संवत्सर गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गावातील वेगवेगळ्या २१ परिसरात अंगणवाडी सेविका, आशासेविका, प्राथमिक शिक्षक यांची २१ पथके तयार करून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची तपासणी करण्यात आली. यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीसह प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस याची वर्गवारी करून नोंद करण्यात आली. त्यानुसार लक्षणे असलेल्या व्यक्तीचे तत्काळ विलगीकरण करून उपचार करण्यात आले.
नगरचे खासदार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी ( दि. २९) या गावाला भेट देत राजेश परजणे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अंगणवाडी सेविका, आशासेविका, प्राथमिक शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी अशा ६२ जणांचा ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या १ लाखांच्या विमासंरक्षणाच्या प्रमाणपत्र व कोविडयोद्धा प्रशस्तीपत्र देण्यात आले.
............
* गावातील एकूण कुटुंब - २,२९९
* सर्वेक्षण केलेली लोकसंख्या : स्त्री - ५,४४७
पुरुष -५,४०७
* ताप, सर्दी अंगदुखीची लक्षणे असलेल्यांची संख्या - १०९
* लस घेतलेल्या व्यक्ती - २,०६०
* कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती - ९८
* सध्या संक्रमित असलेल्या व्यक्ती - ३२
........
कोरोना संकटाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशावेळी कोरोना रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील या उद्देशाने संवत्सर ग्रामपंचायतीने शासन निर्णयाची वाट न पाहता माझे कुटुंब - माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका, आशासेविका आणि शिक्षक यांची २१ पथके तयार करून सर्वेक्षण केले.
- राजेश परजणे, सदस्य, जिल्हा परिषद, नगर
..........