योग दिनी होणार जागतिक विक्रमाची नोंद : वाडिया पार्कमध्ये मेगा योगा इव्हेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:11 PM2019-06-20T18:11:11+5:302019-06-20T18:14:07+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी एकाच वेळी जिल्हाभरात सुमारे १५ लाख नगरकर योगसाधना करुन जागतिक विक्रम प्रस्थापित करतील़
अहमदनगर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी एकाच वेळी जिल्हाभरात सुमारे १५ लाख नगरकर योगसाधना करुन जागतिक विक्रम प्रस्थापित करतील़ यात शाळा, विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक तसेच शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांनी दिली़
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन यांच्यावतीने व जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्या संकल्पनेतून हा महायोगाचा कार्यक्रम होणार आहे़
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिनानिमित्त जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी नियोजन केले आहे़ शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांना पत्र पाठवून २१ जून रोजी सकाळी ७ वाजता योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत़ यात सुमारे ९ लाख ७१ हजार विद्यार्थी सहभागी होतील़ तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कार्यालयातील कर्मचारी असे एकूण सुमारे ४ लाख शासकीय, त्याशिवाय शिक्षक, अंगणवाडी सेविका असे मिळून १ लाख २५ हजार कर्मचारी योगा करतील, असे नियोजन करण्यात आले आहे़ तसेच विविध संघटना, नागरिक यांनीही योग दिनाच्या शासकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास कळविण्यात आले आहे़ त्यामुळे एकाच वेळी सुमारे १५ लाख नागरिक, विद्यार्थी योगा करतील, असे नावंदे यांनी सांगितले़ या योग दिनासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत़
वाडिया पार्कमध्ये मेगा योगा इव्हेंट
नगरमध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलात सुमारे ३५ हजार नागरिक, विद्यार्थी योगा करतील, असे नियोजन केले आहे़ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांच्या बससाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मैदान व इतर संस्था, नागरिकांच्या वाहनाची पार्किं ग व्यवस्था रिमांड होम समोरील मैदान व जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाहेरच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
सेल्फी पॉर्इंट
जिल्हा क्रीडा संकुलात योगा साधकांसाठी सेल्फी पॉर्इंट बनविण्यात येणार आहेत़ तेथे सेल्फी काढून ते योगा लोकेटर या अॅपवर टाकता येतील़