चालण्याशिवाय योग, सूर्यनमस्कार आवश्यक-डॉ.सुबोध देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:16 PM2019-11-13T17:16:25+5:302019-11-13T17:17:24+5:30
आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.
जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष /
अहमदनगर : मधुमेहमुक्त जीवन जगायचे असेल तर जीवनात आरोग्याची चतुसूत्री आवश्यक आहे. आहार, व्यायाम, तणावमुक्त जीवन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे ही खरी आरोग्याची चतुसूत्री आहे, असे मत मधुमेहमुक्त जीवनासाठी प्रबोधन करणारे डॉ. सुबोध देशमुख यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, योग्य आहार, आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळीचे पदार्थ, फळभाज्या, सलाड यांचा समावेश करणे गरजेचे आहे. चालणे गरजेचे आहे. मात्र केवळ चालणे म्हणजे व्यायाम नाही. अनेक जण चालण्याला व्यायाम समजतात. चालण्याशिवाय नित्य जीवनात योगासने, सूर्यनमस्कार, गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम (उदा. जिने चढणे) आदींचा समावेश गरजेचा आहे. समाजात तणाव नाही, असे लोक सापडणे दुर्मीळ आहे. मात्र तणावमुक्त जीवनासाठी रोज ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. शवासन करावे. यामुळे जीवन तणावमुक्त ठेवता येते.
मधुमेह झाल्यानंतर योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे सुरू ठेवावीत. नियमित तपासणी हीच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. स्वत:च्या उंचीच्या अर्ध्यापेक्षा कमरेचा घेरा कमी असावा. उंची ६० इंच असेल तर ३० इंचापेक्षा कमरेचा घेर जास्त नसावा.
आहारावर नियंत्रण आणणे फार गरजेचे आहे. फास्ट फूड, पॅकेट फूड, तळलेले पदार्थ ज्यामध्ये मेदाचे प्रमाण जास्त असते असे पदार्थ खाणे पूर्णपणे थांबवावे. वरणभात-भाजीपोळी असा साधा आहार रोज असावा. थंड पेये टाळावेत. याशिवाय मधुमेह असलेल्यांना शास्त्रीय आरोग्य शिक्षणाची गरज आहे.