युवा शेतकऱ्याने माळरानावर शेती करून सुगंधी तेलाचे केले यशस्वी उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:20 PM2018-12-21T12:20:17+5:302018-12-21T12:20:51+5:30

यशकथा : सुरुवातीला मुळा नदीच्या काठावरील बरड माळरान व्यापारी तत्त्वावर विकसित केली.

The young farmer has made perfumed oil by cultivating unused land | युवा शेतकऱ्याने माळरानावर शेती करून सुगंधी तेलाचे केले यशस्वी उत्पादन 

युवा शेतकऱ्याने माळरानावर शेती करून सुगंधी तेलाचे केले यशस्वी उत्पादन 

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

शाळेत असताना ‘ऊर्ध्वपातन’ म्हणजे द्रवाचे बाष्पात आणि बाष्पाचे पुन्हा द्रवात रूपांतर ही रासायनिक प्रक्रिया मनात पक्के घर करून होतीच. या ज्ञानाच्या शिदोरीवर रसायनशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आंभोळ (ता. अकोले) येथील मच्छिंद्र चौधरी या युवकाने सुगंधी वनस्पतीची शेती ‘अ‍ॅरोमॅटिक फार्मिंग’ करण्याचा निर्णय घेतला.

अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रालगत मुळा नदीच्या काठावरील पठार बरड माळरानावर त्याने पारंपरिक शेती शेततळ्याच्या व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व्यापारी तत्त्वावर विकसित केली. सात एकर शेतात जिरॅनिअम, चार एकर क्षेत्रावर ‘वाळा’ (व्हेटिव्हर) आणि काही क्षेत्रात ‘गवती चहा’ (सिड्रोल्ना) तसेच दीड एकरमध्ये ‘पालमुरजा’ (सुराड्यासारखे गवत) ची लागवड केली. चारही वनस्पतींपासून सुगंधी तेल उत्पादित होते. या वनस्पतींचा उपयोग ‘सौंदर्य प्रसाधने’ (कॉस्मॅटिक) तयार करण्यासाठी केला जात असल्याने उत्पादनास मागणी आहे. जिरॅनिअमच्या शेतात आंतरपीक म्हणून ‘शेवगा’ लागवड केली आहे.

दोन वर्षांपूर्वी २५ रुपयांप्रमाणे जिरॅनिअमची रोपे लखनौ येथून आणली. चार फुटी सरी तयार करून शेणखताच्या बेडवर सव्वा फूट अंतरावर लागवड केली. पिकांवर शेंडअळी, मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नाही. लागवडीच्या वेळी सुपरफॉस्पेट व महाधन टाकले. नत्रासाठी गोमूत्राची फवारणी केली. सुरुवातीला एकरी एक लिटरप्रमाणे हुमीक अ‍ॅसिड व सात किलो युरिया वर खताबरोबर वापरला. पाच-सहा वेळा झिंक सल्फेट बुरशीनाशकाची फवारणी केली. साधारण एप्रिल, मेमध्ये केलेली लागवड फायदेशीर ठरते. चार महिन्यांत पीक कापणीला येते. तीन इंच फुटवा सोडून कापणी करावी. वर्षातून तीन वेळा कापणी होते. कमी पाण्यावरचे हे पीक आहे. वापसा पाहून ठिबकने पाणी दिले. एका कापणीला एकरी दहा टन उत्पादन मिळाले.

साधारण लाखभर रुपये खर्च करून शेतातच त्यांनी ‘ऊर्ध्वपातन’ प्रकल्प उभारला आहे. १ टन गवताला ३५० किलो लाकूड जळणासाठी लागते. चार रोजंदार माणसे दिवसभरात हे काम करू शकतात. १ टनाला साधारण ९०० मिली ते १ लिटर तेल मिळते. साधारणपणे साडेबारा हजार रुपये लिटर तेलास भाव आहे. वर्षात एकरी ३० लिटर तेल मिळाले. त्यातून एकरी साडेतीन लाख रुपये मिळाले असून, दीड लाख रुपये खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे येथील कामगार प्रकाश भोर यांनी सांगितले. 

दोन वर्षात आतापर्यंत अंदाजे अडीचशे ते तीनशे लिटर तेल उत्पादन झाले आहे. आता पाच-दहा लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक बॉयलर व ऊर्ध्वपातन यंत्रणा बसविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जिरॅनिअमच्या ४० हजार व ३० हजार अशा दोन रोपांच्या रोपवाटिका तयार केल्या असून, आठ रुपयांना एक रोप विकले जाते. शेती पाहण्यासाठी शेतकरी दररोज येतात. येत्या २६ डिसेंबरला अमरावती कृषी विद्यापीठात जाऊन मच्छिंद्र चौधरी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 

Web Title: The young farmer has made perfumed oil by cultivating unused land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.