बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:00 PM2018-06-26T14:00:41+5:302018-06-26T14:01:05+5:30
मोटारसायकलवर जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे.
चांदेकसारे : मोटारसायकलवर जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. दादासाहेब सखाहरी चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दादासाहेब चव्हाण हे आपल्या दुचाकीवर सावळीविहीर येथून रात्री गायीचे दूध डेअरीला घालून येत असताना कै.दौलतराव चव्हाण यांच्या वस्तीलगत जेऊरकुभांरी रोडवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चव्हाण यांच्या मोटरसायकलवर झडप मारली. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी रेस करीत आवाज वाढवून आरडाओरड केला. त्यामुळे शेजारी असलेले अक्षय चव्हाण, रोहित जावळे बॅटरी व काठ्या घेऊन धावले. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या झटापटीत चव्हाण यांच्या पाठिला, हाताला व डोळ्याला बिबट्याने ओरबाडल्याने ते जखमी झाले.
नागरिकांनी दूरध्वनीवरून वनविभागाचे अधिकारी जाधव यांना माहिती दिली. जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व परिस्थितीची पहाणी करुन वनविभागाच्या वतीने पिंजरा लावला जाईल. ग्रामस्थांनी संतर्क
राहण्याचे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.
बिबट्याचा बछडा मृतावस्थेत
बोटा : संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी शिवारातील जंगलात सुमारे सात महिने वयाचा बिबट्याचा बछडा शनिवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती घारगाव वनपरिमंडळचे वनपाल बापूसाहेब काळे यांनी दिली. कुरकुंडी शिवारातील महालदरा येथे वनविभागाचे अखत्यारीतील जंगलात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत असल्याचे तेथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या युसूफ पठाण यांच्या निदर्शनास आले. याबाबत घारगाव वनविभागाचे कार्यालयात माहिती देण्यात आली. वनपाल बापूसाहेब काळे वनरक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बछडा सात महिने वयाचा नर जातीचा असल्याचे व त्याचा मृत्यू आजारामुळे झाला असल्याचे वनपाल बापूसाहेब काळे यांनी सांगितले.