टँकरच्या धडकेत तरुणाचा, डंपरच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू
By शेखर पानसरे | Published: March 28, 2023 03:00 PM2023-03-28T15:00:39+5:302023-03-28T15:02:17+5:30
संगमनेर तालुक्यात अपघातांच्या घटना; तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल.
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सोमवारी (दि. २७) संध्याकाळी सात ते साडे सात वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले, यात दोघांचा मृत्यू झाला. दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला डंपरची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
रविंद्र बाबासाहेब पवार (वय ३२, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर) आणि माही अजीज पठाण (वय ४, रा. मेंढवण, माळवाडी, ता. संगमनेर) अशी अपघातांतील मयतांची नावे आहेत.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविंद्र पवार हे दुचाकीहून (एम. एच. १७, बी. जी. ७६५) तळेगाव दिघे येथे घराकडे येत होते. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर एका हॉटेलजवळ लोणीकडून नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरची (एम. एच. १७, बी. डी. ४५०४) पवार हे प्रवास करीत असलेल्या दुचाकीला समोरून धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले, त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला. मयत पवार यांचे बंधू किरण बाबासाहेब पवार (रा. तळेगाव दिघे, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभात डेअरीचे दूध टँकर (एम. एच. १७, बी. डी. ४५०४) वरील चालक (नाव, पत्ता माहीत नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास माळवाडी मेंढवण वस्ती येथील एका घरासमोर चालक त्याच्या ताब्यातील ढंपर (एम. एच. ०४, एफडी ४१७६) मागे घेत असताना अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय बालिका माही पठाण हिला डंपरची धडक बसली, तिचा मृत्यू झाला. डंपर चालक राजेंद्र भागवत बडे (रा. मेंढवण, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रमजान अहमद पठाण (रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक विजय खंडीझोड अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"