गोळीबारात तरुण जागीच ठार; जागेच्या वादातून श्रीरामपूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 PM2020-05-24T17:00:22+5:302020-05-24T17:00:32+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटेवस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
श्रीरामपूर : तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटेवस्ती भागात जागेच्या वादातून एका तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
मयताचे नाव गणेश साळवे (वय २८, रा. जोशी वस्ती, निपाणी वडगाव) असे आहे. त्याच्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. दहा ते बारा जणांनी तलवारीने हल्ला केला. गावठी कट्ट्यातून गणेश याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी घुसल्याने जागेवर मृत्यू झाला. श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. गोळी लागून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र जगधने यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करीत होते. रुग्णालयामध्ये मयताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपींची धरपकड सुरू केली. त्यात सहा आरोपींना पकडण्यात यश आले. आरोपींमध्ये राजेंद्र बाबासाहेब गांगुर्डे, धोंडीराम तुकाराम इंगळे, गजानन सखाराम गांगुर्डे, सारिका राजेंद्र गांगुर्डे, पार्वतीबाई बाबासाहेब गांगुर्डे, सुखदेव भानुदास इंगळे (रा. लाटेवस्ती) यांचा समावेश आहे.