अहमदनगर जिल्ह्यात तरुण, महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण २० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:21 PM2020-07-26T12:21:28+5:302020-07-26T12:24:07+5:30
अहमदनगर : शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र लोकांचे मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे. शहरी भागात ६० टक्के लोकच मास्क वापरतांना दिसत आहेत. तरुण आणि महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण केवळ २० टक्केच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
सुदाम देशमुख
अहमदनगर : शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र लोकांचे मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे. शहरी भागात ६० टक्के लोकच मास्क वापरतांना दिसत आहेत. तरुण आणि महिलांचे मास्क वापरण्याचे प्रमाण केवळ २० टक्केच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
कोरोनामुळे मार्च-एप्रिलमध्ये लॉकडाऊन होता. या काळात लोक फारसे घराबाहेर पडले नाहीत. मे व त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांची मास्कसाठी मागणी वाढली. या काळात जिल्ह्यात रोज पाच ते सहा हजार मास्कची विक्री झाली. सध्याच्या स्थितीला मात्र मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे.‘लोकमत’ने केलेल्या आॅनलाईन पाहणीत सध्या शहरी भागात ६० टक्केच लोक मास्क वापरतांना दिसत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण फक्त २० टक्केच आहे, तर तेवढेच महिलांचे प्रमाण आहे. यावरून लोक अजूनही बेफिकिरपणे वागत असल्याचे दिसते आहे.
मास्क न वापरण्याची ही आहेत कारणे
५० टक्के महिला घरीच थांबतात
इतर महिलांकडून मास्कऐवजी स्कार्फचा वापर
शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तरुण घरातच
दुचाकीवर फिरणारे मास्कचा वापर टाळतात
नागरिकांकडून पंचा, रुमालाचा वापर
अनेकांकडून मास्क गळ््यात अडकवला जातो
---------------------
प्रति दिवसाला एक लाख मास्क तयार करण्याची क्षमता आहे. तीन मे पासून थ्री प्लायरचे ६० लाख मास्क विक्री झाले. सध्या रोज पाच लाख मास्क तयार करण्याची यंत्राची क्षमता आहे. ती आता दहा लाख प्रतिदिन मास्क तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरमध्ये आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मास्क विक्री झाले पाहिजे होते. मात्र मास्क वापरण्याबाबत म्हणावी तेवढी जागृती नसल्याने नगरमधून मागणी खूपच कमी आहे.
- सुनील कानवडे, मास्क उत्पादक
---------------
सर्वसामान्य लोकांमध्ये कापडी मास्कना सर्वाधिक पसंती आहे. वारंवार धुऊन ते मास्क वापरले जातात. म्हणून या मास्कला ग्राहकांची जास्त पसंती आहे. दहा रुपयांचा युज अॅण्ड थ्रो असलेला थ्री प्लेयर डिस्पोजल मास्क सर्वात सुरक्षित आहे. मात्र ग्राहक वारंवार वापरता येईल अशा २० रुपयांच्या कापडी मास्कला जास्त पसंती देतात.
-मनोज खेडकर, विक्रेता
-----------------------------
मास्क वापरण्याचे प्रमाण
साधारण प्रमाण
५० ते ६० टक्के
महिला २० ते ३० टक्के
तरुण २० ते ३० टक्के
४० ते ६० वयोगट
७० ते ८० टक्के
-----------------
असे आहे मास्कचे मार्केट...
कापडी मास्क- २० रुपये
एम-९५ मास्क-१५० ते २०० रुपये
डिस्पोजल मास्क- १० रुपये
दिवसाला विक्री होणारे मास्क- ६ हजार