मतदानावेळी भिडले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:37 PM2018-09-13T12:37:57+5:302018-09-13T12:38:01+5:30
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला.
श्रीरामपूर : युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. आमदार कांबळे व उपनगराध्यक्ष ससाणे गटात झालेला हा दुसरा राडा असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची डोकेदुखी वाढली आहे.
येथील व्यापारी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी मतदानास सुरवात झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे हे स्वत: प्रदेश महासचिवपदासाठी रिंगणात आहेत. विधानसभा समितीकरिता माजी नगराध्यक्ष संजय फंड यांचे चिरंजीव सिद्धार्थ उमेदवारी करीत होते. सकाळपासूनच मतदान केंद्रावर ससाणे समर्थकांची मोठी गर्दी होती. युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी ससाणे यांच्या पारड्यात वजन टाकले आहे.दरम्यान, आमदार पुत्र व नगरसेवक अॅड.संतोष कांबळे आपल्या समर्थकांसह केंद्रावर आले. कांबळे यांच्या पत्नी सुधा यांनी मतदान प्रतिनिधीला आधारकार्ड दाखविले. मात्र त्यावर मतदान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावरून वादावादी सुरू झाली.
या दोन्ही गटात गेल्या काही दिवसात झालेला हा दुसरा राडा आहे. आमदार कांबळे यांनी ससाणे समर्थकांवर आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोपही केला होता. पुढील काळात होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरिता हे वाईट संकेत मानले जात आहेत. विरोधी पक्ष नेते विखे यांना मानणारे हे दोन्ही गट आहेत. मात्र या अंतर्गत लढाईपुढे त्यांनीही हात टेकले असल्याचे दिसते. ससाणे समर्थकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.