सावकारांच्या दहशतीने तरुण घरातून बेपत्ता; राहुरी तालुक्यातील प्रकार

By शिवाजी पवार | Published: May 17, 2023 01:35 PM2023-05-17T13:35:24+5:302023-05-17T13:35:35+5:30

सावकारांनी पैशांच्या वसुलीसाठी दहशतीचा वापर केल्याने प्रवीण याने घर सोडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Youth disappeared from home due to fear of moneylenders in Rahuri | सावकारांच्या दहशतीने तरुण घरातून बेपत्ता; राहुरी तालुक्यातील प्रकार

सावकारांच्या दहशतीने तरुण घरातून बेपत्ता; राहुरी तालुक्यातील प्रकार

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बोधेगाव (ता. राहुरी) येथील प्रवीण गोरक्षनाथ बेंद्रे हा तरुण बेकायदा सावकारांच्या तगाद्याला कंटाळून दहा दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला आहे. सावकारांनी पैशांच्या वसुलीसाठी दहशतीचा वापर केल्याने प्रवीण याने घर सोडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

बेपत्ता प्रवीण (वय ३५) यांचे बंधू संदीप गोरक्षनाथ बेंद्रे यांनी या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुखांना मंगळवारी निवेदन दिले. राहुरी पोलिस ठाण्यात ११ मे या दिवशी प्रवीण यांच्या पत्नी मोहिनी यांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तातडीने प्रवीण याचा शोध घेण्याची कुटुंबीयांची मागणी आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबीय चिंतित आहे.

देवळाली प्रवरा येथून गायींना औषधे आणण्याकरिता जातो, असे सांगून प्रवीण याने ६ मे या दिवशी घर सोडले. त्यानंतर ते पुन्हा घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाइकांकडे माहिती घेतली; मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही, असे पत्नी मोहिनी यांचे म्हणणे आहे. पोलिसांना प्रवीण यांचे मोबाइल फोन आणि दुचाकीचा तपशील देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रवीण याने शेती कामासाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, करजगाव, उंबरे येथील सहा सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. व्याजासह मुद्दलाचे पैसे सावकारांना त्याने परत केले. काही शेतजमिनीची विक्री करावी लागली. सावकारांची देणी देण्यासाठी अद्यापही काही जमीन गहाण ठेवण्यात आलेली आहे. मात्र, तरीही सावकारांचा तगादा मिटलेला नाही. हे सर्व सावकार आपल्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत आहेत. फोनवरून शिवीगाळ करीत आहेत, असे प्रवीण यांचे बंधू संदीप यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Youth disappeared from home due to fear of moneylenders in Rahuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.