तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:21 PM2024-11-08T16:21:13+5:302024-11-08T16:22:21+5:30

आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह असलेली गोणी घेऊन ते चारचाकी वाहनातून प्रवरासंगमला गेले.

Youth shot dead body thrown in river to destroy evidence | तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग!

तरुणाची गोळ्या झाडून हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला नदीत; आरोपींचे असे फुटले बिंग!

Ahilyanagar Murder Case ( Marathi News ) : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत घालून प्रवरासंगम येथील नदीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कल्याण देविदास मरकड (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

पंकज राजेंद्र मगर (वय ३५), इरशाद जब्बार पठाण (वय ३८), अमोल गोरक्ष गारुडकर (वय ३३, तिघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मयत तरुण हा शुक्रवारी (दि. १) रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी पंकज मगर व जब्बर पठाण यांना भेटण्यासाठी तिसगावला गेला होता. हे तिघे तिसगाव येथील पेट्रोलपंप शेजारील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेले होते. त्यावेळी पंकज मगर व मयत कल्याण मरकड यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाले. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या रागातून मगर याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून मरकड याच्या कपाळावर गोळी झाडली. त्यात कल्याणचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह असलेली गोणी घेऊन ते चारचाकी वाहनातून प्रवरासंगमला गेले. तेथील पुलावरून आरोपींनी मयताचा मृतदेह नदीत फेकून दिला. मयत तरुण घरी आला नाही. म्हणून नातेवाइकांना संशय आला. नातेवाइकांनी कल्याण बेपत्ता असल्याची तक्रार पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली. प्रवरासंगम येथे सापडलेला मृतदेह कल्याणाचाच असल्याचे उघड झाले. आरोपींना अटक करून नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

असा केला उलगडा 

प्रवरासंगम येथील नदीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान पाथर्डी पोलिस ठाण्यात तिसगाव येथील तरुण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास हाती घेतला. प्रवरासंगम येथील नदीत सापडलेला मृतदेह तिसगाव (ता. पाथर्डी) येथील तरुणाचाच असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणात आरोपींची नावे समोर आली.

आरोपीला रणशिंगने पुरविला गावठी कट्टा 

आरोपीने गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी हस्त केला. याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता दत्ताचे शिंगवे (ता. पाथर्डी) येथील सचिन रणशिंग याने गावठी कट्टा दिल्याचे सांगण्यात आले.


 

Web Title: Youth shot dead body thrown in river to destroy evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.