भेंड्यातील गोळीबारात युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:44+5:302021-05-05T04:33:44+5:30
भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी (दि.२) रात्री झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला असून ...
भेंडा : भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) येथे रविवारी (दि.२) रात्री झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गोळीबाराचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१, रा. भेंडा, ता. नेवासा) असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर सोमनाथ तांबे हा मित्र स्वप्नील बाबासाहेब बोधक याच्या घराच्या पाठीमागे मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गेला होता. व्हॉलीबॉल खेळत असताना रात्री ९.२० च्या सुमारास खेळता-खेळता बॉल देवगाव ते लांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे गेला. तो बॉल आणण्यासाठी सोमनाथ हा रस्त्याकडे गेला. रस्त्याच्या कडेला अंधार असल्याने तो बॉल शोधत असताना रस्त्यावर समोर एक दुचाकी उभी असल्याचे दिसले. दुचाकीवर एक व्यक्ती बसलेली होती तर दुसरी व्यक्ती बाजूला उभी होती. दरम्यान, सोमनाथ तांबे हा दोन्ही हाताने बॉल उचलत होता. त्याचवेळी समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सोमनाथच्या दिशेने पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या शस्त्रातून फायर केला. त्यातील गोळी सोमनाथच्या छातीच्या मधोमध लागली. त्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतर ते दोघे देवगावच्या दिशेने पळून गेले, असे सोमनाथ तांबे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे
याबाबत पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याशी संपर्क साधला असता जखमी सोमनाथ तांबे याच्या जबाबावरून संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.
---
नगरच्या पथकाकडून पाहणी
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन व्हॉलीबॉलचे मैदान व गोळीबार घडल्याच्या ठिकाणाची पहाणी केली. अहमदनगर येथून पाचारण करण्यात आलेल्या पथकाने मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने निकामी झालेली बुलेट शोधण्यासाठी मोहीम राबविली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक भरत दाते उपस्थित होते.