पोहण्यासाठी गेलेला नगरचा युवक मुळा धरणात बुडाला, चमेली गेस्ट हाऊसच्या मागील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 11:35 PM2022-07-17T23:35:50+5:302022-07-17T23:35:59+5:30
Ahmednagar : मयत चेतन क्षीरसागर हा तरुण नगर येथील भिस्तबाग नगर येथील रहिवासी असून तो हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते.
राहुरी (जि. अहमदनगर) : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नगर येथील भिस्तबाग भागातील ३८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
अहमदनगर येथील ६ ते ७ जण मुळा धरण पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी ४ वाजता पाण्यात पोहण्यासाठी उतरलेला चेतन कैलास क्षीरसागर (वय ३८, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग रोड, सावेडी) हा तरुण गायब झाला. पाच वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या तरुणाची माहिती ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख, माजी सरपंच अंकुश बर्डे यांना समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस नाईक गणेश सानप यांनी पट्टीचे पोहणारे छबू पवार, विजय पवार, इंद्रजित गमे या स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर चेतनचा मृतदेह बाहेर काढला.
मयत चेतन क्षीरसागर हा तरुण नगर येथील भिस्तबाग नगर येथील रहिवासी असून तो हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. त्याच्यासोबत त्याचे मित्र सोमनाथ देवकर, बाळकृष्ण धारणकर, संतोष मेहेत्रे, बाळासाहेब शिंदे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे, संदिप शिंदे, आशुतोष भागवत, राजेंद्र करपे, योगेश पतले, नितीन फल्ले, मिलिंद क्षीरसागर (रा. अहमदनगर) असा १३ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी गेला होता.
रविवारमुळे धरणावर पर्यटकांची गर्दी असते. अनुचित घटना घडू नये म्हणून धरणाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना जाण्यास बंदी होती. नगरहा हा ग्रुप जलसंपदाच्या कर्मचारी वसाहतीमधील रस्त्याने चमेली गेस्ट हाऊसजवळ गेले. तेथील पटांगणात भोजन केल्यानंतर चमेली गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस धरणात पोहण्यासाठी उतरले, तर काहीजण काठावर बसले. या मृत्यू प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.