महसूल कर्मचाऱ्यांमागे परीक्षेचे ‘झिंगाट’
By Admin | Published: July 25, 2016 11:58 PM2016-07-25T23:58:16+5:302016-07-26T00:02:27+5:30
अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागते़ मात्र नोकरीत दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विविध परीक्षांना सामोरे जावे लागत आहे़
अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागते़ मात्र नोकरीत दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विविध परीक्षांना सामोरे जावे लागत असून, महसूलच्या लिपिकांची विभागीय दुय्यम सेवा परीक्षा सोमवारपासून सुरू झाली आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमागे सध्या परीक्षांचे झिंगाट सुरू असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे़
सरकारी नोकरीत दाखल झाल्यानंतर विविध वेतनश्रेणी पदरात पाडून घेण्यासाठी परीक्षा घेण्यात येतात़ महसूलच्या कर्मचाऱ्यांची वर्षातून अशा दोनवेळा परीक्षा होत असतात़ विभागीय दुय्यम सेवा परीक्षा आणि त्यानंतर महसूल अर्हता परीक्षा घेण्यात येते़ पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुसरी परीक्षा देण्यात येते़ पहिल्या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ८९ लिपिक पात्र आहेत़ त्यापैकी ५६ लिपिकांनी अहमदनगर महाविद्यालयात सोमवारी झालेल्या परीक्षेस हजेरी लावली़ उर्वरित ३३ लिपिकांनी परीक्षेलाच दांडी मारली आहे़
विभागीय दुय्यम सेवा परीक्षेचे एकूण पाच पेपर आहेत़ पहिला न्यायिकबाब हा २०० गुणांचा पेपर असून, ही परीक्षा येत्या २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत़ त्यामुळे परीक्षा देणाऱ्या लिपिकांचा सर्वाधिक वेळ परीक्षेत जात असल्याने त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी वेळ मिळत नाही़ एकट्या पुरवठा विभागातील सहा कर्मचारी परीक्षा देत आहेत़ त्यामुळे पुरवठा विभागाचे नियोजन कोलमडले आहे़
विभागीय दुय्यम परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांच्या नियमित कामाची माहिती विचारली जाते़ परीक्षेत भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, ग्राम पोलीस अधिनियम, जमीन महसूल, लेखा पद्धती, कार्यालयीन कामाची पद्धत, भूसंपादन, गोषवारा लिहिणे, सरकारचे विविध कायदे, नागरी सेवा नियम, पदग्रहण, अवधी, परसेवा, निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकण्याबाबतचे नियम, सेवानिवृत्ती नियम, कोषागार नियमांबाबतचे प्रश्न असतात़
विविध पाच पेपर दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात येते़ ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार नाशिक येथे होणाऱ्या महसूल अर्हता परीक्षेस पात्र ठरतात़ अर्हता परीक्षा नाशिक येथे घेण्यात येते़ ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वेतनश्रेणी व पदोन्नती येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़
(प्रतिनिधी)