नगरमधील दोन किलोमीटरचा परिसर सील करणार; महापालिकेकडून कार्यवाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 01:18 PM2020-05-12T13:18:19+5:302020-05-12T13:21:09+5:30
नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्लीच्या मध्यभागापासून दोन किलोमीटरचा परिसर सील करण्यात येणार आहे.
अहमदनगर : नगर शहरात गेल्या महिनाभरापासून एकही कोरोनाचा रुग्ण नसताना मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी आलेल्या अहवालात नगरमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्लीच्या मध्यभागापासून दोन किलोमीटरचा परिसर सील करण्यात येणार आहे.
अहमदनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्यादृष्टीने मंगळवारी सकाळीच तयारी सुरू केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेचे देशपांडे रुग्णालय आणि बीएसएनएल आॅफिस हा परिसर येतो. हा संपूर्ण परिसर रस्ते वगळून सील करण्यात येणार आहे.
संबंधित रुग्णाची हिस्ट्री तपासण्याचे काम आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी सुरू केले आहे. या रुग्णांची चौकशी केल्यानंतर ही व्यक्ती परगावातील आहे की नगरमधीलच आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.