पालकमंत्र्यांच्या उपकारावर जिल्हा परिषद मिळवली नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:22 PM2018-10-31T14:22:30+5:302018-10-31T14:22:42+5:30

विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

Zilla Parishad did not get the support of guardian minister: Sujay Vikare | पालकमंत्र्यांच्या उपकारावर जिल्हा परिषद मिळवली नाही : सुजय विखे

पालकमंत्र्यांच्या उपकारावर जिल्हा परिषद मिळवली नाही : सुजय विखे

हळगांव : विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र आम्ही श्रेय लाटण्यासाठी कधीच खोटेपणा केला नाही. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून बोगसपणाचे राजकारण सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसने मिळवलेली सत्ता ही कुणी दान केलेली नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाने कष्ट घेतले. जिल्हा परिषदेची सत्ता पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपकारावर मिळवलेली नाही, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील हळगांव येथील श्री सिध्देश्वर दत्त देवस्थानच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी विखे बोलत होते.
सुजय विखे म्हणाले, कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघात २५ वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. तरीही मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. मतदारसंघात पालकमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या गप्पा मारल्या जातात मग हा निधी गेला कुठे? नुसते भूमीपूजन होत असतील अन विकास कामे होत नसेल तर मग पालकमंत्र्यांच्या फसवेगिरी विरोधात मी बोलणारच. आमची स्पर्धा पालकमंत्र्यांशी नाही तर माझे भांडण पालकमंत्री पदाशी आहे. ज्या दिवशी छावण्या पालकमंत्री सुरू करतील त्या दिवशी माझे भाजपाविरोधी भाषण बंद होईल, असे सांगत जोवर छावण्या सुरू होत नाहीत तोवर मी शेतक-यांचा आवाज बनून भाजपाविरोधात आपली भूमिका मांडत राहणार. दुष्काळात जनतेला दिलासा देण्यात पालकमंत्री अपयशी ठरत आहेत. ज्या पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला जातो ते काय जिल्ह्यातील दुष्काळावर जनतेला दिलासा देतील असा सवाल विखे यांनी केली. भाजपाने तीव्र, मध्यम, कमी असा नवीन दुष्काळ तयार करत जनतेची थट्टा चालवली आहे. एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिंदेंनी तीव्र, मध्यम व कमी दुष्काळाची नेमकी व्याख्या काय आहे हे जनतेला सांगावे.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटो अथवा न सुटो दक्षिणेचा गड कुठल्याही परिस्थितीत काबीज करायचाच आहे त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढवेन पण भाजपसोबत जाणार नाही अशी घोषणा करत लोकसभेचे मैदान मारण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे सांगत आपली पुढील दिशा स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते किसनराव ढवळे हे होते. यावेळी सिध्देश्वर दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे, सरपंच अनिता सुशेन ढवळे, राजेंद्र ढवळे, किसनराव ढवळे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय ढवळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, युवकचे अध्यक्ष अमोल राळेभात, लतिफभाई शेख, बबनराव तुपेरे, आप्पासाहेब उबाळे, धनगर समाजाचे जेष्ठ नेते मारूती करगळ, अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे, डॉ अविनाश पवार, राजुभैय्या सय्यद, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, धनेगांवचे सरपंच कल्याण काळे, कृष्णा चव्हाण, कांतीलाल ढवळे, भिमराव डूचे, नानासाहेब ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय ढवळे यांनी केले तर सुत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले.

छावण्या कधी सुरु करणार
रस्ते नको, मंदिर नको आता दुष्काळात जनतेला पिण्याचे पाणी व पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या कधी सुरू करणार याची तारिख पालकमंत्री राम शिंदेंनी जाहिर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या नियोजनाच्या कौशल्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता नियोजनाचे कौशल्य शिंंदे यांनी दाखवावं. नियोजनाचे कौशल्य दाखवले तर विधानसभेला त्यांचा प्रचार करेन, असे सुजय विखे म्हणाले.


दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारी
कोण कुठून आला याला महत्व नाही. जनतेच्या प्रश्नासंबंधी जो थेटपणे आक्रमक भूमिका घेईल. त्याचबरोबर स्व कर्तृत्वावर जनतेला दिलासा देईल याला महत्व आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारी पडला आहे. स्थानिक डॉक्टरांनी( सत्ताधारी भाजपाने) जनतेला फसवल्यामुळे जनतेने बाहेरील मेंदूचा डॉक्टर बोलवला आहे. आता ऐकेकाचे मेंदू ठिक करण्याचे काम करावे लागणार असल्याचे विखे म्हणाले.

 

 

 

Web Title: Zilla Parishad did not get the support of guardian minister: Sujay Vikare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.