अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारला संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:06 PM2019-09-09T16:06:04+5:302019-09-09T16:07:31+5:30
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
अहमदनगर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.
राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी (दि. ७) जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत झाली. यात जिल्हा परीषदेतील बांधकाम, शिक्षण विभाग, आरोग्य, लेखा, लिपिक वर्गीय कर्मचारी, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील सर्व शिक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक व सर्व विस्तार अधिकाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि.९) सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात तांत्रिक कर्मचारी वगळता इतर सर्वांनी सहभाग घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज सोमवारी पूर्णपणे ठप्प झाले होते. ९ सप्टेबरच्या संपातील प्रमुख मागण्या शासनाकडून मान्य न झाल्यास तसेच ठोस निर्णय न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालये व सर्व शाळा त्यामुळे बंद राहणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.