जिल्हा परिषद :पोषण आहाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:57 AM2018-09-28T11:57:08+5:302018-09-28T11:57:26+5:30
शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे.
अहमदनगर : शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकांनी शाळांना भेटी देऊन धान्याआदी मालाचे वजन व दर्जाची तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या पोषण आहाराबाबत सदस्यांनी शिक्षण समितीच्या सभेत तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने तालुकानिहाय पोषण आहार तपासण्यासाठी पथक स्थापन केले असून, या पथकामार्फत तपासणी सुरू आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनानेही नगर तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारातील धान्याआदी मालाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामुळे पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, शिक्षण विभागाने पोषण आहाराची तपासणी करण्याचे मनावर घेतले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पुरविला जाणारा पोषण आहार मोजून घेतला जात नाही. शाळास्तरावर धान्य मोजून घेण्याची कुठलीही व्यवस्था नाही़ त्यामुळे मुख्याध्यापक धान्य मोजून न घेताच वाहनचालकांना पोहोच पावती देत आहेत़ परिणामी शाळेला कमी अन्नधान्याचा पुरवठा होतो, असे सदस्यांचे म्हणने आहे.
शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावरही एक पथक स्थापन करण्यात आले असून, पुढील आठवड्यात तपासणीचे अहवाल प्राप्त होईल़ त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.-रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद