जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:25+5:302020-12-31T04:21:25+5:30
चंद्रकांत शेळके अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू असून, यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या गटातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी ...
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू असून, यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या गटातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे या पदाधिकाऱ्यांच्या गटात निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांत गटातील गावांनी पदाधिकाऱ्यांच्या मागे ताकद उभी केली म्हणून त्यांना जिल्हा परिषदेवर संधी मिळाली. आता या पदाधिकाऱ्यांनी गावात लक्ष घातले आहे; परंतु आता ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गटतट, हेवेदावे असल्याने पदाधिकारी कितपत गावांपर्यंत पोहोचतात व किती ग्रामपंचायती आपल्या ताब्यात
ठेवतात याकडे लक्ष लागले आहे. एकूणच या निवडणुकीत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.
---------
अध्यक्षांचा दहिगावने गट
जि. प. अध्यक्ष राजश्री घुले राष्ट्रवादीकडून निवडून आल्या असून त्यांच्या दहिगावने (ता. शेवगाव) गटात एकूण २२ गावे आहेत. त्यापैकी १२ गावांत निवडणूक होत आहे. यात घुले यांच्या दहिगावने गावात निवडणूक नाही. मात्र, घोटण, भावी निमगाव, ताजणापूर, खुंटेफळ या गावांत लढती असून राष्ट्रवादी या गावांत वर्चस्वासाठी प्रयत्न करत आहे.
----------
उपाध्यक्षांचा देहरे गट
उपाध्यक्ष प्रताप शेळके काँग्रेसकडून निवडून आले असून, त्यांच्या देहरे (ता. नगर) गटात एकूण १७ गावे आहेत. त्यापैकी १५ गावांत निवडणूक होत आहे. यात त्यांच्या स्वत:च्या देहरे गावासह पिंपळगाव माळवी, नवनागापूर या राजकीयदृष्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. गतवेळी सर्वच पक्ष वेगळे लढले होते; परंतु आता काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी अशी महाआघाडी या निवडणुकीत एकत्र उतरल्याने या गटात बहुतांश ग्रामपंचायती काबीज करू, असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.
---------
बांधकाम सभापतींचा टाकळी ढोकेश्वर गट
कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते शिवसेनेकडून निवडून आले असून, त्यांच्या टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) या गटात एकूण २५ ग्रामपंचायती आहेत. या गटातील सर्वच गावांत निवडणूक होत आहे. टाकळी ढोकेश्वर, कर्जुलेहर्या, वासुंदे, खडकवाडी या मोठ्या गावांतील लढतीकडे लक्ष असून यात स्वत: दाते यांच्या म्हसोबा झाप-गुरेवाडी या गावातही निवडणूक होत आहे.
-------
महिला बालकल्याण सभापतींचा साकूर गट
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे या काँग्रेसकडून निवडून आल्या असून त्यांच्या साकूर (ता. संगमनेर) गटात एकूण २२ गावे आहेत. त्यापैकी पिंपळगाव ढेपा, शिंदोडी, कवठे मलकापूर, शेंडेवाडी आदी ९ गावांत निवडणूक होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या ताब्यातीलच या ग्रामपंचायती आहेत. शेटे यांच्या जांबूत गावासह साकूरमध्येही या टप्प्यात निवडणूक नाही.
---------
अर्थ सभापतींचा खरवंडी गट
अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडून आले. त्यांच्या खरवंडी (ता. नेवासा) गटात एकूण १८ गावे असून त्यातील खरवंडी, खेडले परमानंद, वाटापूर, म्हाळस पिंपळगाव आदी ७ गावांत निवडणूक होत नाही. खरवंडीसह इतर गावे बिनविरोध करण्यासाठी गडाख प्रयत्नशील आहेत.
---------------
समाजकल्याण सभापतींचा कुळधरण गट
समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर हे राष्ट्रवादीकडून निवडून आले असून, त्यांच्या कुळधरण (ता. कर्जत) गटात एकूण ३२ गावे आहेत. त्यापैकी २८ गावांत निवडणूक होत आहे. कुळधरणमध्ये मात्र निवडणूक नाही.