जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा
By चंद्रकांत शेळके | Published: October 1, 2023 05:46 PM2023-10-01T17:46:11+5:302023-10-01T17:46:51+5:30
आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी आधी जाहीर केलेले वेळापत्रक चार दिवसांनी पुढे ढकलले आहे. आता ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील परीक्षा होणार आहेत. आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ‘क’ वर्ग प्रवर्गातील ९३५ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या ८ संवर्गासाठी ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेचे हाॅलतिकीट डाऊनलोड करण्याची प्रतीक्षा उमेदवारांना असतानाच शुक्रवारी (दि.२९) प्रशासनाने आधीचे वेळापत्रक रद्द करून आता ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीतील सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारही बुचकळ्यात पडले आहेत.
दरम्यान, आधीच शासकीय विविध पदांच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक विघ्न येत असताना जिल्हा परिषदेची परीक्षाही सुखरूप पार पडेल की नाही याबाबत उमेदवारांकडून शंका उपस्थित होत आहेत. राज्यात सर्व जिल्हा परिषद पदभरतीची प्रक्रिया आयबीपीएस ही खासगी कंपनी राबवत आहे. परंतु अनेक जिल्हा परिषदांकडून केंद्र निश्चितीसह इतर तयारी बाकी असल्याने ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे.
हाॅलतिकीट कधी मिळणार?
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ९३५ जागांसाठी ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच वेळी या पदांसाठी परीक्षा होत आहे. जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हाॅलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता ७ तारखेच्या परीक्षेचे हाॅलतिकिट कधी मिळणार, हाही प्रश्न आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या परीक्षा नियोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
वरिष्ठ सहायक (लेखा) - ७ ऑक्टोबर
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - ८ ऑक्टोबर
विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक - ८ ऑक्टोबर
लघुलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- ११ ऑक्टोबर