जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर

By चंद्रकांत शेळके | Published: December 9, 2023 08:06 PM2023-12-09T20:06:11+5:302023-12-09T20:06:40+5:30

आरोग्यसेवक, सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असे सर्वाधिक अर्ज आलेल्या पदांची परीक्षा अद्याप बाकी आहे. त्यामुळे अभ्यास किती दिवस करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 

Zilla Parishad recruitment exam issue Examination of only half of the candidates in two months | जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे गुऱ्हाळ सुरूच; दोन महिन्यांत अर्ध्याच उमेदवारांची परीक्षा, सवडीनुसार वेळापत्रक जाहीर

अहमदनगर : तब्बल १० वर्षांनंतर जिल्हा परिषदेची पदभरती निघाली. मोठ्या उत्साहाने उमेदवारांनी भरभरून अर्ज केले. कशीबशी परीक्षेची तारीखही जाहीर झाली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कासवगतीने ही परीक्षा सुरू असून अजून निम्म्या ही उमेदवारांची परीक्षा झालेली नाही. आरोग्यसेवक, सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असे सर्वाधिक अर्ज आलेल्या पदांची परीक्षा अद्याप बाकी आहे. त्यामुळे अभ्यास किती दिवस करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 

राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांची १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती होत आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात ५ ॲागस्ट २०२३ ला प्रसिद्ध झाली. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गांतील ९३७ पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. त्यामुळे या भरतीसाठी जिल्ह्यातून ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरल्यानंतर परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा होती. अखेर दोन महिन्यांनी ३ ॲाक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. तेव्हापासून अजून ही परीक्षा सुरूच आहे. यात अनेकदा वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले.

वेळापत्रकाचे तुकडे
आयबीपीएस या कंपनीमार्फत ऑनलाइन या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही परीक्षा सुरू आहे. मात्र एकत्रित सर्व संवर्गांचे वेळापत्रक कंपनीला अद्याप जाहीर करता आलेले नाही. परीक्षा केंद्रांची व्यवस्था होईल तसे केवळ दोन किंवा तीन संवर्गांचे वेळापत्रक ऐनवेळी जाहीर केले जाते. ते पाहण्यासाठी उमेदवारांना अलर्ट रहावे लागते. सतत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहणी करावी लागते.

अजून या संवर्गाची परीक्षा बाकी
१९ पैकी ११ संवर्गांची परीक्षा दोन महिन्यांत कशीबशी संपली आहे. तर तीन संंवर्गांचे वेळापत्रक जाहीर झाले असून ती परीक्षा १८ ते २१ डिसेंबरदरम्यान होणार आहे. मात्र ५० टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरूष ५० टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरूष इतर ४० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

परीक्षा शुल्कापोटी ४ कोटी
या परीक्षेसाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी १ हजार, तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आहे. जिल्ह्यात ४४ हजार ७२६ जणांनी अर्ज भरल्याने केवळ शुल्कापोटी ४ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

उमेदवार कंटाळले
या भरतीची प्रक्रिया चार महिन्यापूर्वी ५ ऑगस्टपासून अर्ज भरण्यापासून सुरू झाली. तरी अद्याप सर्व उमेदवारांची परीक्षा संपलेली नाही. अजूनही निम्मे उमेदवार परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. एकाच परीक्षेची प्रक्रिया चार-चार महिने चालणार असेल तर किती दिवस अभ्यास करायचा, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत. परीक्षेलाच इतका विलंब तर निकाल व नियुक्ती कधी मिळणार? हाही प्रश्नच आहे.
 

Web Title: Zilla Parishad recruitment exam issue Examination of only half of the candidates in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.