पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी

By चंद्रकांत शेळके | Published: July 2, 2024 10:05 PM2024-07-02T22:05:50+5:302024-07-02T22:06:18+5:30

: जागेअभावी २०० विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही प्रवेश

Zilla Parishad School of Pimpri Jalsen has more student than private school | पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी

पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा खासगी शाळेवर भारी, २२ गावांतून येतात विद्यार्थी

अहमदनगर: दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या कमी होत चालल्याचे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असले तरी जिल्हा परिषदेच्या काही शाळा मात्र खासगी शाळांवरही भारी पडत आहेत. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन जिल्हा परिषदेच्या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असून, परिसरातील २२ गावांतून येथे विद्यार्थी खासगी बसने येतात. एखाद्या नामवंत इंग्रजी शाळेपेक्षाही या शाळेत प्रवेशासाठी उड्या पडत आहेत.

सातवीपर्यंतच्या या शाळेची पटसंख्या ३७५ आहे. यंदा तर प्रवेशासाठी एवढ्या उड्या पडल्या की २०० ते २५० विद्यार्थ्यांना जागेअभावी प्रवेश नाकारावे लागले. शैक्षणिक अभ्यासक्रमासह शिष्यवृत्ती, चित्रकला, नवोदय प्रवेशाची तयारी, राज्य मंडळासह एनसीआरटीई अभ्यासक्रमाचीही उजळणी अशा विविध उपक्रमांमुळे शाळेची गुणवत्ता एवढी वाढली आहे की, पालक या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत आहेत. एवढेच नव्हे तर परिसरातील २२ गावांतून विद्यार्थी सहा खासगी बस करून या शाळेत येत आहेत.

सातवीपर्यंतचे सर्व प्रवेश फुल्ल
पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत या वर्षी ३७५ पटसंख्या आहे. यंदा पहिलीपासून सर्वच वर्गातील प्रवेश फुल्ल झाले. सध्या शाळेत नऊ वर्गखोल्या आहेत. तरीही जागा कमी पडत असल्याने २०० ते २५० विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव प्रवेश नाकारावा लागला. सर्व प्रवेश दिले असते तर शाळेची पटसंख्या ६०० वर गेली असती.

शिष्यवृत्तीसाठी १३, नवोदयसाठी ५ विद्यार्थ्यांची निवड
यंदा झालेल्या शिष्यवृत्तीसाठी या शाळेतून पाचवीचे १३ विद्यार्थी पात्र ठरले; तर नवोदय विद्यालयासाठी ५ विद्यार्थ्यांची निवड झाली. एकाच शाळेतून एवढ्या मुलांची निवड झालेली ही जिल्ह्यातील अव्वल शाळा असावी. सहावी ते सातवीचे वर्ग येथे सेमी इंग्रजी अभ्यासक्रमात चालविले जातात.

लोकसहभागातून भौतिक सुविधा
लोकसहभागातून शाळेत अनेक भौतिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. यात सुसज्ज वर्गखोल्या, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, शिष्यवृत्तीसाठी ॲानलाइन क्लास घेतले जातात. त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढत आहे.

८ शिक्षकांचे परिश्रम
मुख्याध्यापकांसह एकूण आठ शिक्षक या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेत आहेत. ग्रामस्थांचीही त्यांना मोलाची साथ मिळत आहे. त्यामुळेच अवघ्या दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील ही शाळा राज्य पातळीवर झळकली आहे.

स्टेट बोर्डसह एनसीआरटीईचा प्रयोग
राज्य मंडळाचा अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच एनसीआरटीईच्या अभ्याक्रमाचीही शाळेत उजळणी केली जाते. एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारी बहुधा ही पहिलीच शाळा असावी. त्यामुळे ही मुले पुढे कोणत्याही माध्यमाच्या मुलांशी सहज स्पर्धा करू शकतात.

अशी वाढली शाळेची पटसंख्या
सन पटसंख्या
२०१८ - १२५
२०१९ -१४१
२०२० - १५७
२०२१- १८८
२०२२-२५०
२०२३-३२५
२०२४-३७५

जिल्हा परिषदेचे सीईओ, शिक्षणाधिकारी व इतर सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने गुणवत्तावाढीसाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. कोणत्याही माध्यमाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर आहे. त्याला यश येत आहे, याचा आनंद वाटतो.
- सतीश भालेकर, उपक्रमशील शिक्षक, पिंपरी जलसेन जि. प. शाळा

Web Title: Zilla Parishad School of Pimpri Jalsen has more student than private school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.