जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:30 PM2019-05-07T12:30:18+5:302019-05-07T12:31:09+5:30
जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय भाऊ साळवे आणि पाथर्डी पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक आनंद दत्तात्रय दिकोंडा यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी सोमवारी निलंबित केले.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील टेंडर घोटाळ्याप्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय भाऊ साळवे आणि पाथर्डी पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक आनंद दत्तात्रय दिकोंडा यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी सोमवारी निलंबित केले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील ७०० टेंडरची चौकशी जिल्हा परिषदेने सुरु केली होती़ सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रमोद राऊत, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) कासार यांची द्विसदसीय समिती या चौकशीसाठी नेमण्यात आली होती़ या समितीने तब्बल ७०० फाईल तपासून चौकशी पूर्ण केली. या चौकशीचा गोपनीय अहवाल बंद पाकिटात गत आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार पाचेगाव येथील पाणी योजनेत घोटाळा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.
पाचेगाव (ता़ नेवासा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाचेगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती़ १ कोटी ४५ लाख रुपयांच्या या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आॅनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली़ यात एका ठेकेदाराने सर्वात कमी म्हणजे १ कोटी २० लाख रुपये (उणे तीन टक्के) रकमेचे टेंडर भरले होते़ ते आॅनलाईन मंजूरही करण्यात आले़ मात्र, कार्यारंभ आदेश देताना ज्या ठेकेदाराने ६ टक्के जास्त रकमेची निविदा भरली होती, त्या ठेकेदाराच्या नावाने कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता़ त्यामुळे संबंधित ठेकेदाराला निविदा रकमेपेक्षा सुमारे ९ लाख रुपये जास्तीचे मिळणार होते़ याबाबत तक्रार आल्यानंतर या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात आली़ त्यात हा टेंडर घोटाळा उघडकीस आला होता़
या प्रकरणात दिकोंडा यांनी निविदा दरामध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषद सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. नळ पाणी पुरवठा योजनेची नस्ती व रकमेत फेरसादर असल्याची बाब दत्तात्रय साळवे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेली नव्हती. असे असताना ती निविदा नस्ती मंजुरीसाठी सादर केली. या दोघांच्या वर्तणुकीमुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग झाल्याने त्यांना निलंबित केल्याचे माने यांनी आदेशात म्हटले आहे.