जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा
By Admin | Published: May 14, 2016 11:44 PM2016-05-14T23:44:32+5:302016-05-14T23:49:47+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता.
अहमदनगर : जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी रिक्त जागांचा तपशील अपडेट नसल्याने गोंधळ झाला होता. शनिवारी उपाध्यापकांच्या बदलीच्या प्रक्रियेदरम्यान मोठी गर्दी झाल्याने जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप आले होते. मुख्यालय इमारतीच्या आवारापासून इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर शिक्षक बसलेले होते.
यंदा ८ हजार ५०० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. यात शिक्षण विभागाने पेसा, समानीकरण, विनंती, आपसी बदल्यांच्या प्रक्रियेसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार न केल्याने एकाच वेळी सर्व शिक्षक जिल्हा परिषदेत जमा झाले. हजारो शिक्षकांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत उपाध्यापकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. अतिशय संथ गतीने सुरू असणाऱ्या प्रक्रियेमुळे सायंकाळी ५ पर्यंत पेसातील बदल्या सुरू होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि अन्य अधिकारी जि. प. सभागृहात ठाण मांडून होते.
शनिवारी झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत ५७ उपाध्यापक पेसातून बाहेर आले. तर सायंकाळपर्यंत ३५ शिक्षक पेसात आधी विनंतीने आणि नंतर प्रशासकीय बदलीने गेले आहेत. ही प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. सोमवारी पदवीधर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच गाजल्या आहेत. समानीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षकांची गैरसोय झाली आहे. याबद्दल नाराजीचे वातावरण आहे.