पाण्याचे टँकर बंद केल्याने जि.प. अध्यक्षा संतप्त
By Admin | Published: August 5, 2016 11:42 PM2016-08-05T23:42:41+5:302016-08-05T23:43:25+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही.
अहमदनगर : जिल्ह्यात अद्याप सर्वत्र पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा वाढलेला नाही. त्यात शासनाने जिल्ह्यातील पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ग्रामीण भागात यामुळे पाणीबाणी निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना त्यांनी पत्र दिले आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या संख्येने पाण्याचे टँकर सुरू होते. उन्हाळ्यात हा आकडा ७५० च्या पुढे गेला होता. दरम्यान, जुलै महिन्यात झालेले पावसाने जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरची संख्या ३०५ पर्यंत खाली आली होती.
शासनाने ३० जून ते २१ जुलैपर्यंत पाण्याचे टँकर सुरू ठेवण्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने जिल्ह्यात सर्वत्र पिण्याचे पाणी उपलब्ध झाले की नाही, याची खातरजमा न करताच पाण्याचे सर्व टँकर बंद केले आहेत.
यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भू गर्भातील पाणीसाठा न वाढल्याने पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अध्यक्षा गुंड संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तातडीने शासनाला अहवाल देवून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
(प्रतिनिधी)
तालुकानिहाय सुरू असणारे टँकर
पारनेर ८७, श्रीगोंदा ७५, कर्जत ४५, संगमनेर ३९, नगर ३०, जामखेड २०, नेवासा ३, राहाता ३, राहुरी २, पाथर्डी १ यांचा समावेश आहे. शासन पाण्याचे टँकर सुरू करतांना तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संयुक्त पाहणी करण्यास सांगते. मग बंद करतांना या दोघांनी एकत्र पाहणी करून टँकर बंद करावेत, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.