कोपरगावसह ११ गावांना पुराचा तडाखा

By admin | Published: August 4, 2016 12:23 AM2016-08-04T00:23:51+5:302016-08-04T00:25:00+5:30

कोपरगाव : गोदावरी नदीला सुमारे अडीच लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने कोपरगावसह अनेक गावांना पुराचा तडाखा बसला.

11 villages along with Kopargaon hit the flood | कोपरगावसह ११ गावांना पुराचा तडाखा

कोपरगावसह ११ गावांना पुराचा तडाखा

Next

कोपरगाव : गोदावरी नदीला सुमारे अडीच लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने कोपरगावसह अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. शहर व तालुक्यातील अनेक भागामध्ये पाणी घुसल्याने एकूण ३०५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात डाऊचच्या पुराण बेटावर अडकलेल्या २२ नागरिकांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण करण्यात आले. परंतु पाण्याची खोली पाहून पथकाने नकार दिल्याने १२ तास उलटूनही त्यांना बाहेर काढता आले नाही.
दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मदत मागितली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येणार आहे. दारणा व गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर धरणात प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरूवात झाली. कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, धारणगाव, मुर्शतपूर, कोपरगाव आदी गावांना जोडणारा पूलही पाण्यात बुडाल्याने या गावांचा संपर्क तुटला. पहाटे चारच्या सुमारास सुमारे अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने शहरातील अनेक भागांत पाणी घुसले. त्यामुळे ७० कुटुंबातील ३५० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर तालुक्यातील कुंभारी, माहेगाव देवी, हिंगणी, कोपरगाव, धारणगाव, मुर्शतपूर, वारी, कोळगाव थडी, सुरेगाव व जेऊर कुंभारी या गावांतील बाराशे लोकांना इतरत्र हलवण्यात आले.
कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर ५-६ फूट पाणी वाढल्याने समता पतसंस्थेसह आसपासच्या अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले आहे. मुख्य रस्ता बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत होवून संपर्क तुटला आहे. नुकसानग्रस्त भागाची सकाळी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पाहणी केली. काळे उद्योग समूहाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी पूरग्रस्तांची भेट घेवून दिलासा दिला. दुपारी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी डाऊचला भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार प्रशांत खेडेकर, संजीवनीचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, सरपंच विमल दहे, उपसरपंच बाबासाहेब दहे व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आज रेस्क्यू आॅपरेशन
नाशिकचे महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी डाऊचला भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर स्पिड बोट मागविण्यात आल्या. या बोटींव्दारे बेटावर अडकलेल्या नागरिकांना अन्न व पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी अंधार पडत असल्याने गुरूवारी सकाळी अडकलेल्या नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाची पंचाईत
मंगळवारी दुपारी चार वाजता पुराण बेटावरील नागरिकांना डाऊचच्या दिशेने येण्याची विनवणी तहसीलदार प्रशांत खेडेकर हे करीत होते. परंतु पाणी वाढणार नसल्याचे सांगत या लोकांनी बाहेर येण्यास नकार दिल्याने प्रशासनाची पंचाईत झाली.
मदतकार्यासाठी पुढाकार
नगरपालिकेच्या वतीने पाणी व आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. संजीवनी व कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आपत्ती ग्रस्तांसाठी जेवणाची व सामान स्थलांतरित करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
बाजारपेठ बंद
नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. गोदावरी नदीवरील अनेक पूल पाण्याखाली जावून इतर गावांचा संपर्क तुटल्याने दळण-वळण ठप्प झाले. शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद पडली. लिंबारा परिसरातील ७ कुटुंबांना रात्री २ वाजता सुरक्षितपणे घरातून बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच त्यांची घरे कोसळली.
२००६ च्या पुराची आठवण
या पुरामुळे कोपरगावकरांना २००६च्या पुराची आठवण झाली. गोदावरी नदीवरील जुन्या मोठ्या पुलाचे आयुर्मान संपत आले आहे. कमकुवत बनलेल्या याच पुलावरून सध्या वेगाने वाहतूक सुरू आहे.
पुणतांब्यात २२ कुटुंब सुरक्षितस्थळी
पुणतांबा : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पुणतांब्यातील नदीकाठ असलेली मंदिरे पाण्याखाली गेली आहेत़ या शिवाय काठावरील २२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे़ दरम्यान काँग्रेसचे युवक नेते डॉ़ सुजय विखे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना तहसीलदार सुभाष दळवी यांना केल्या़
गोदावरीच्या पुराचे पाणी मंगळवारी सायंकाळी पुणतांबा येथे पोहोचले़ पुरामुळे ब्राह्मण घाटावरील दत्त मंदिर, शनि मंदिर, लक्ष्मीआई मंदिर पाण्याखाली गेले असून कार्तिकस्वामी मंदिराजवळील मंदिरे देखील पाण्याखाली गेले आहेत़ नदीकाठी असलेल्या २२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था केल्याचे तहसीलदार दळवी यांनी सांगितले़ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत करण्याबाबत डॉ़ सुजय विखे यांनी सूचना केल्या़ यावेळी माजी जि़प़ सदस्य डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, विजय धनवटे, राजेंद्र थोरात, शुक्लेश्वर वहाडणे, भास्कर नवले, तलाठी गणेश वाघ, कोळेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते़ पुणतांब्यातील पूरग्रस्तांना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावतीने जेवणाची पाकिटे देण्यात आली़ यावेळी उपसरपंच बलराज धनवटे, चंद्रकांत वारेकर, अशोक धनवटे, संभाजी गमे, सुधाकर जाधव उपस्थित होते़ गोदावरीला आलेल्या पुरामुळे कातनाला पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोपरगावकडे जाणारी वाहतूक बंद होती़ (वार्ताहर)

Web Title: 11 villages along with Kopargaon hit the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.