चासनळी आरोग्य केंद्राच्या दोन डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरमधील घटना

By सचिन धर्मापुरीकर | Published: August 11, 2023 04:27 PM2023-08-11T16:27:08+5:302023-08-11T17:07:01+5:30

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे मृत्यू प्रकरण

A case has been registered against three people including two doctors of Chasnali health center | चासनळी आरोग्य केंद्राच्या दोन डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरमधील घटना

चासनळी आरोग्य केंद्राच्या दोन डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरमधील घटना

googlenewsNext

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर): प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत, डॉ. साक्षी सेठी व ॲम्बुलन्सचालक संजय शिंदे यांच्याविरुद्ध तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी अशोक राणू वाघ यांची मुलगी रेणुका किरण गांगुर्डे (वय २०, रा. वडाळी, ता. निफाड, जि. नाशिक) ही प्रसूतीसाठी माहेरी आली होती. दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता रेणुका हिस प्रसूती वेदना होत असल्याने तिला चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. उपस्थित असलेल्या परिचारिकेने धामोरी येथील उपकेंद्रात जाण्याचा सल्ला दिला. अशोक वाघ यांनी ॲम्बुलन्सची मागणी केली, तेव्हा ॲम्बुलन्समध्ये डिझेल नसल्याचे कारण पुढे आले. अशोक वाघ यांनी धामोरीच्या उपकेंद्रात मुलीला नेले, तिथे तिची प्रसूती झाली परंतु, अति रक्तस्त्रावामुळे रेणुकाची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी १० ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, रेणुका गांगुर्डे हीला वेळेत उपचार मिळाले नाही. वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत व डॉक्टर साक्षी सेठी कर्तव्यावर हजर नव्हते, तसेच ॲम्बुलन्स चालक संजय शिंदे याने रुग्णास घेऊन जाण्यास दिरंगाई केली. त्यामुळे रेणुका गांगुर्डे हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस तिघेही कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा आशयाच्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध भादंवी ३०४ (अ), १०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत. 

चौकट 

खोत निलंबित; सेठी व शिंदे यांची सेवा समाप्ती 

याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी ९ ऑगस्ट रोजी चासनळी आरोग्य केंद्रास भेट देऊन जबाब नोंदविले. त्यानंतर बुधवारी रात्री चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहिल खोत यांना निलंबित करण्यात आले, तर डॉक्टर साक्षी सेठी व ॲम्बुलन्स चालक संजय शिंदे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाही करण्यात आली होती. त्यानंतर आता तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against three people including two doctors of Chasnali health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.