आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप
By शिवाजी पवार | Published: March 14, 2023 03:53 PM2023-03-14T15:53:37+5:302023-03-14T15:56:00+5:30
दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
श्रीरामपूर : हैद्राबाद येथील आमदार राजासिंग याच्याविरूद्ध शांतताभंग तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. आमदार राजासिंग यांची शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी येथील थत्ते मैदानावर श्रीराम सेवा संघाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये राजासिंग यांनी चिथावणीखोर भाषण केले होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सुरवडे याप्रकरणी तपास करत आहेत.
दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, तसेच जनसमुदायाला चिथावणी दिल्या प्रकरणी शहरातील बाबुरपुरा येथील मुजीब राजू शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजासिंग यांनी भाषणादरम्यान अल्पसंख्यांक समुदायाविषयी प्रक्षोभक भाषण केले. त्यांनी अत्यंत विखारी भाषाप्रयोग केला. यामुळे दंगलसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका होता, असे शेख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील जमावाने शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता. प्रक्षोभक भाषण देणार्या राजासिंग याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आंदोलकांची मागणी होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत विना परवानगी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा आणल्या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदिल मखदुमी, शोएब जमादार, तौफिक शेख, मौलाना इर्शाद, मुजीब शेख व इतर ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तपास करत आहेत.