युवकांना कृषी रोजगाराची दिशा

By Admin | Published: March 20, 2016 12:47 AM2016-03-20T00:47:03+5:302016-03-20T00:48:10+5:30

लोणी : देशामध्ये मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र सुरू असतानाच कृषी क्षेत्रातून देखील मोठा उद्योग उभा राहून शेतकरी समृद्ध होऊ शकतो,

Agricultural employment direction for youth | युवकांना कृषी रोजगाराची दिशा

युवकांना कृषी रोजगाराची दिशा

googlenewsNext

लोणी : देशामध्ये मेक इन इंडिया, राज्यात मेक इन महाराष्ट्र सुरू असतानाच कृषी क्षेत्रातून देखील मोठा उद्योग उभा राहून शेतकरी समृद्ध होऊ शकतो, हाच संदेश बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संपन्न झालेल्या कृषी उद्योजकता परिषदेत शेतकऱ्यांना देण्यात आला.
बाभळेश्वर (ता. राहाता) येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता परिषद आणि यूथ किसान मंच हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांच्या संकल्पनेतून शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी म्हणून मागील दोन वर्षापासून शेळीपालन, दुग्धोत्पादन, गांडूळ खत, कोंबडीपालन यासह फळ प्रक्रिया, अ‍ॅग्री क्लिनिक्स अ‍ॅग्री बिझनेस अशा १० ते १५ विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
आजपर्यंत केंद्रामार्फत दोन ते अडीच हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून मोठा स्वयंरोजगार निर्माण झाला. याच युवकांना आपल्या व्यवसायात दिशा देण्यासाठी शनिवारी संपन्न झालेली कृषी उद्योजकता परिषद दिशादर्शक आणि ‘मेक इन कृषी’ साठी महाजागरच ठरली आहे.
ग्रामीण युवक-युवतींना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करतानाच बँक अर्थसहाय्य, मार्केटिंग प्रकल्प आराखडा आदी विषयाचे ज्ञान दिले. याशिवाय शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी नवीन जाती, गांडूळ खत, फळबाग छाटणी तंत्र, दुग्ध व्यवसायातील नवे तंत्रज्ञान देण्यात आले.
जमुना पारी, शिरोही, बोर आदी शेळ्यांच्या नव्या जाती या उद्योजकांनी आणून हा व्यवसाय समृद्ध देखील केला आहे. राज्यात कृषी उद्योगास मोठी संधी असून, याकडे जाणीवपूर्वक आणि युवकांनी उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. याला आर्थिक पाठबळ आणि शासनाची मदत मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या व्यवसायास प्रतिष्ठा देण्याचा सूर देखील परिषदेत व्यक्त झाला.
कृषी उद्योजकतानिमित्त तांत्रिक सत्रामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी शेळीपालन, दुग्धोत्पादन, शेडनेट पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला लागवड व विक्री, कृषी उद्योजकता व्यक्तिमत्त्व, गांडूळ खत, स्पिरूलिना यावर परिसंवाद झाले. यानिमित्त कृषिपूरक व्यवसायाचे प्रदर्शन देखील ठेवण्यात आले होते. (वार्ताहर)
कृषी क्षेत्रात युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. तसे झाले तर कृषी क्षेत्रात दिशादर्शक काम उभे राहू शकते, हाच उद्देश ठेवून केंद्राकडून यूथ किसान क्लबची स्थापना करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर १०० गावांमधून २०० युवकांचे हे संघटन नव्या तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करणार असून, यामध्ये दहावीपासून पीएच.डी. पर्यंतच्या युवा शेतकऱ्यांचा सहभाग आहे. यातून शेतीचा शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे.
- डॉ. भास्कर गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र
----------------------------------------------------
ग्राहक बदलत आहे. शेळीपालन, दुग्धव्यवसाय यात मोठी संधी आहे. ती शोधण्याची गरज आहे. सेंद्रिय दूध, सेंद्रीय मटन ही संकल्पना पुढे येत आहे. पशुपालन करताना नव्या तंत्रज्ञानाच्या वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. नितीन मार्केंडेय

Web Title: Agricultural employment direction for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.