इंदोरीकर महाराजांची दिलगिरी; वाचा डॉक्टर, शिक्षक, माता-भगिनींना लिहिलेलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:38 PM2020-02-18T13:38:05+5:302020-02-18T13:53:44+5:30
तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतो, असं निवृत्ती महाराज इंदोरीकर म्हणाले आहेत.
नगर: मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर लेखी माफीनामा दिला आहे. माझ्या 'त्या' विधानाचा मीडियानं विपर्यास केला आहे. तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतो, असं निवृत्ती इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मानसन्मान असलेला तमाम महिला वर्गाची ही माफी मागतो.
आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरूपी सेवेतील ह्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, अंधश्रद्धा मिटवून विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्यानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.
इंदुरीकर महाराज म्हणतात; 'कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!'
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणाले, 'माझे सध्या वाईट दिवस...'
गेल्या काही दिवसांपूर्वी निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या सर्व प्रकारानंतर इंदोरीकर महाराज उद्विग्न झाले. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदोरीकर महाराजांनी केला होता. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी भावनाच इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकाराचे इंदोरीकर महाराजांनी यू ट्युबवाले आणि कॅमेरावाल्यांवर खापर फोडले आहे. 'यू ट्युबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदोरीकरला संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे,' असं त्यांनी सांगताच उपस्थित अवाक् झाले.