राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना

By साहेबराव नरसाळे | Published: July 16, 2023 07:27 PM2023-07-16T19:27:06+5:302023-07-16T19:28:01+5:30

नगरसेवक शिंदे फरार, इतर चौघे ताब्यात.

Assault of BJP corporator on NCP official, incident in Ahmednagar city | राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर भाजप नगरसेवकाचा प्राणघातक हल्ला, अहमदनगर शहरातील घटना

इनसेटमध्ये आरोपी स्वप्निल शिंदे.

googlenewsNext

अहमदनगर : जुन्या वादातून भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह इतर १३ ते १४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो संपला का पहा, नसेल संपला तर संपवा, असे नगरसेवक स्वप्नील शिंदे हा आरोपींना सांगत होता. एकविरा चौकात शनिवारी रात्री हा थरार रंगला.

याप्रकरणी अंकुश चत्तर यांचे दाजी बाळासाहेब भानुदास सोमवंशी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन शिंदे याच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१५) रात्री १०.१५ वाजता एकविरा चौकात काही तरुणांचे भांडण सुरु होते. त्यातील अदित्य गणेश औटी या तरुणाने चत्तर यांना फोन करुन भांडण सोडविण्यास बोलावले. चंदन ढवण व चत्तर यांनी हे भांडण सोडविले व ते तेथून जात असताना राज फुलारी या तरुणाने चत्तर यांना थांबण्यास सांगितले. त्याचवेळी दोन काळ्या रंगाच्या देवास नाव लिहिलेल्या गाड्या तेथे आल्या.

या गाड्यांमधून नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे व इतर ७ ते ८ जण उतरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे होते. महेश कुऱ्हे याच्या हातामध्ये बंदुक होती. ते सर्वजण अंकुश चत्तर यांच्याजवळ आले व तू स्वप्निल भाऊंचे नादी लागतोस काय? तुला स्वप्निलभाऊ काय आहे ते दाखवतो आता असे म्हणत सुरज उर्फ मिक्या कांबळे याने लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी इतरांनी चत्तर यांना मारण्यास सुरुवात केली. नगरसेवक स्वप्निल शिंदे हा याला संपवून टाका रे असे म्हणत चत्तर यांच्यादिशेने धावत आला. ते पाहून चत्तर हे सिटी प्राईट हॉटेलच्या दिशेने पळू लागले. त्यावेळी इतर आरोपी चत्तर यांच्या मागे पळत त्यांना मारत होते. चत्तर यांच्या डोक्यात मार लागल्याने ते रस्त्यावर पडले. त्यावेळी सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, महेश कुऱ्हे हे हातातील रॉडने चत्तर यांच्या डोक्यावर घाव घालत होते. तर याला संपवून टाका रे असे अभिजीत बुलाखे सांगत होता. तोही पळत येऊन चत्तर यांच्या डोक्यावर रॉडने घाव घालू लागला. त्याचवेळी स्वप्निल शिंदे तेथे आला व हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका व चला लवकर असे म्हणाला व सर्वजण गाडीत बसून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यांच्याविरोधात झाला गुन्हा दाखल
भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजु फुलारी (सर्व रा. अहमदनगर) व इतर ७ ते ८ जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault of BJP corporator on NCP official, incident in Ahmednagar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.