भुजबळांना भाजपकडून ऑफर, जरांगे पाटलांचा आरोप
By शिवाजी पवार | Published: November 23, 2023 04:54 PM2023-11-23T16:54:05+5:302023-11-23T16:55:05+5:30
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : सरकारमधील जबाबदार पदावरील मंत्री छगन भुजबळ हे मराठा आंदोलनावर आरोप करत आहेत. त्यांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे त्यांना आवरत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे श्रीरामपूर येथे बुधवारी रात्री सभेसाठी आले होते. त्यानंतर ते येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.
मंत्री भुजबळ हे मराठा समाजाविरूद्ध बोलत आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री काहीच प्रतिक्रिया नोंदवत नाहीत. ते भुजबळ यांना थांबवत नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू आहे का? अशी शंका येते. उपमुख्यमंत्री फडणवीस हे काहीच बोलत नसल्यामुळे शंका येत आहे. भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची असावी. कारण त्यांना तशी सवय आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा पलटी मारली आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे वाटोळे करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना? अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी भुजबळांना आवरावे. तसे झाले नाही तर आमच्यात बदल करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. राज्यभर मराठा व ओबीसी समाज एकत्र आहे. गावोगावी ते एकत्र चहा पितात. एकमेकांच्या लग्न कार्यात जातात. प्रेमाने व भावासारखे वागतात. त्यांनी यापुढेही असेच वागावे. आपल्यामध्ये मतभेद ठेवू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.