अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन, गोविंदगिरी महाराजांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 02:41 PM2020-03-08T14:41:27+5:302020-03-08T14:51:07+5:30
Ram Mandir : श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल. त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल.
अहमदनगर - अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलरोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी आज अहमदनगर येथे दिली. अयोध्येतील वादग्रस्त भूमिखाली राम मंदिरच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता.
गोविंदगिरी महाराज म्हणाले, ''श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल. त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल. संपूर्ण मंदिर हे पाषाणाचे बनविले जाणार आहे. त्यासाठी किती खर्च येईल हे चार एप्रिल रोजी आकडा ठरेल. मंदिर भव्य असेल. ते केवळ मंदिर नसेल तर जगाची सांस्कृतिक व संस्काराची राजधानी होईल. प्रत्येक राज्याचे भवन तिथे ऊभारले जावे, असाही प्रयत्न असेल.''
'राम मंदिरामधून प्रत्येकाला जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. तसेच या मंदिरात रामलल्लाच्या जुन्या मूर्तीसह नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत खाते उघडण्यात येणार असून, त्यात ऑनलाईन निधी संकलन होणार आहे,' असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.
दरम्यान, '30 एप्रिलरोजी राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान व संघाचे सरसंघचालक उपस्थित राहतील. राम मंदिराला सर्वात आधी शिवसेनेने नव्हे तर तिरुपती देवस्थानने शंभर कोटी घोषित केले आहेत. त्यांनी निधी दिला, त्याचे स्वागतच आहे. राम मंदिराचा आधीचा आराखडा हा जुना आहे. त्यात मंदिराच्या भव्यतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.' असेही त्यांनी सांगितले.