कॅन्सरने मला मृत्यू नव्हे, जगायचे कसे ते शिकविले-मनिषा कोईराला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:22 PM2020-01-12T12:22:32+5:302020-01-12T12:23:29+5:30

 कॅन्सरने मला मृत्यू नाही दिला तर जीवन काय असते अन् ते कसे जगायचे हे शिकविले, असे भावनिक उद्गार काढत कॅन्सरसारख्या आजाराने खचून जाऊ नका तर आनंदी जीवनाची इच्छाशक्ती ठेवा, असे आवाहन अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी उपस्थित महिलांना केले. 

Cancer taught me how to live, not death | कॅन्सरने मला मृत्यू नव्हे, जगायचे कसे ते शिकविले-मनिषा कोईराला 

कॅन्सरने मला मृत्यू नव्हे, जगायचे कसे ते शिकविले-मनिषा कोईराला 

अहमदनगर : मला कॅन्सर झाला आहे, हे समजले तेव्हा आता माझा मृत्यू निश्चित आहे असे वाटले होते. बाहेरच्या जगाशी मी संपर्क तोडला होता. मात्र आईचा आशीर्वाद आणि कुटुंबीयांच्या पाठबळातून मी या आजाराशी यशस्वी संघर्ष केला़ आज मी तुमच्यासमोर आहे. कॅन्सरने मला मृत्यू नाही दिला तर जीवन काय असते अन् ते कसे जगायचे हे शिकविले, असे भावनिक उद्गार काढत कॅन्सरसारख्या आजाराने खचून जाऊ नका तर आनंदी जीवनाची इच्छाशक्ती ठेवा, असे आवाहन अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी उपस्थित महिलांना केले. 
 महिलांमध्ये आढळणा-या कर्करोगाबाबत (कॅन्सर) समाजात जनजागृती व्हावी,  या उद्देशाने शहरातील मॅककेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर कॅन्सर सोसायटी व आनंदसाई फाउंडेशनच्या सहयोगातून आयोजित ‘आशेची पालवी’ या कार्यक्रमात कोईराला यांनी उपस्थित महिलांशी कॅन्सर या आजाराबाबत संवाद साधला. शहरातील बंधन लॉन येथे शनिवारी (दि़११) सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाचे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या उपस्थित उद्घाटन झाले. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, धनश्री विखे,  सुजाता लंके, निर्मला मालपाणी, सुजाता तनपुरे, प्रभावती ढाकणे, सविता बोठे, श्रीमरापूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रिया जाधव, डॉ़ उज्ज्वला सोनवणे, डॉ़ चैताली काशिद, डॉ़ मरियम माजिद, डॉ़ वैभवी वंजारे, डॉ़ स्मिता पटारे, डॉ़ संजीवनी जरे, डॉ़ वर्षा शिंदे आदी महिला उपस्थित होत्या़. कार्यक्रमात निवेदक आकाश आफळे यांनी मनिषा कोईराला आणि डॉ़ सतीश सोनवणे यांच्याशी संवाद साधला़ सोनवणे यांनी कॅन्सर हा आजार काय आहे? तर कोईराला यांनी या आजाराशी कसा संघर्ष करावा याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. 
कोईराला पुढे म्हणाल्या, आपल्याला कॅन्सरसारखा आजार झाला आहे हे जेव्हा कळते तेव्हा आता सर्वकाही संपले आहे अशी भावना निर्माण होते. अशावेळी कुटुंबीय आणि समाजाचे पाठबळ आवश्यक असते. कॅन्सर बरा करण्यासाठी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रत्येक उपचाराचा सामना केला. काही दिवसानंतर मनातील भीती दूर झाली. अखेर या आजारातून मी पूर्णत: बरी झाले. संजू या चित्रपटातून मी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाले. प्रबळ इच्छाशक्तीतून हे शक्य झाले. कुठल्याही आजाराला समोरे जाताने हिंमत सोडू नका, स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि या समाजासाठी मला जागायचे आहे, असा सकारात्मक विचार करा, असे आवाहन यावेळी कोईराला यांनी केले. 
कार्यक्रमात कोईराला यांच्याहस्ते डॉ़ सतीश सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आशेची पालवी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला मॅककेअर हॉस्पिटलचे डॉ़. सोनवणे, डॉ़. प्रशांत पटारे, डॉ. आनंद काशिद, डॉ. मोहंम्मद माजीद, डॉ. सुदाम जरे, डॉ. अभिजित शिंदे, डॉ़. पंकज वंजारे, डॉ. निलेश परजणे, डॉ़. सुशील नेमाने, उद्योजग योगेश मालपाणी, निनाद शिंदे, सी.ए़. अजय भंडारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या़. 
‘त्या’ महिलांची इच्छाशक्ती पाहून मनिषा कोईराला झाल्या प्रेरित 
आशेची पालवी या कार्यक्रमात कॅन्सर या आजारातून ब-या झालेल्या सहा महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ़ सतीश सोनवणे यांच्याकडे या महिलांनी उपचार घेतले होते. या महिलांनी आजारातून बरे झाल्यानंतर कसे निरोगी आयुष्य जगत आहोत, याबाबत उपस्थितांना माहिती दिली़. या महिलांचे अनुभव ऐकल्यानंतर मनिषा कोईरालाही पे्ररित झाल्या. तुमच्यासारखेच मी पण जीवनाचा आनंद घेत इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे असल्याचे कोईराला यांनी सांगितले. 

Web Title: Cancer taught me how to live, not death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.