संख्याबळ निश्चितीवरून मनपा महासभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 11:41 PM2016-07-20T23:41:23+5:302016-07-20T23:49:08+5:30

अहमदनगर : स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्रपणे आक्षेप घेतला.

Confusion in the Municipal General Assembly | संख्याबळ निश्चितीवरून मनपा महासभेत गोंधळ

संख्याबळ निश्चितीवरून मनपा महासभेत गोंधळ

Next

अहमदनगर : राजकीय पक्षांचे संख्याबळ चुकीच्या पद्धतीने निश्चित करून व बेकायदेशीर प्रक्रिया राबवून स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्रपणे आक्षेप घेतला. स्थायी समितीचे सदस्य नियुक्तीबाबत महापालिका अधिनियमातील कलम ३१(अ)ची माहिती अधिकाऱ्यांनी न दिल्याने महासभेत तब्बल तासभर गोंधळ झाला. मात्र याच गोंधळात स्थायीच्या सदस्यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करून महापौरांनी सभा आटोपती घेतली. सदस्य नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी यांचा लेखी अभिप्राय सभेत सादर न केल्याने सभेनंतरही महापालिकेत दिवसभर गोंधळ सुरू होता.
कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खूनप्रकरणी विरोधी नगरसेवकांनी तीव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर कोपर्डीच्या निर्भयाला महासभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेचे नियोजित कामकाज सुरू झाले.
सुरवातीलाच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी संख्याबळ निश्चितीला अत्यंत आक्रमक पद्धतीने आक्षेप घेतला. याबाबतचे कलम ३१ (अ) काय आहे, हे सभागृहाला वाचून दाखवावे, जिल्हाधिकारी यांनी नगरसचिवांना नेमका अभिप्राय काय दिला आहे, याची सभागृहाला माहिती द्यावी, याबाबत कळमकर यांनी वारंवार मागणी केली. मात्र याबाबत प्रभारी आयुक्त, महापौर, नगरसचिव यांनी तासभर मौन धारण केले. यावरूनच सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्वप्नील शिंदे, कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर यांनीही बेकायदेशीर प्रक्रियेला आक्रमकपणे विरोध केला. पाऊण तासांच्या गोंधळानंतर महापौरांच्या सूचनेवरून नगरसचिवांनी कलम ३१(अ) वाचून दाखविले, मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेला अभिप्राय वाचून न दाखविल्याने गोंधळात भर पडली. आमचे नगरसेवक शांत आहेत, या महापौरांच्या वाक्याला स्वप्नील शिंदे यांनी आक्षेप घेतला.
महापौरांनी आमचे-तुमचे असा भेद केल्यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला. याचवेळी दोन-तीन वेळा विरोधी नगरसेवकांनी महापौर-नगरसचिवांना व्यासपीठावर चढून घेराव घातला. गॅलरीमधील उपस्थितांचा गोंधळ सुरू झाल्याने त्यांना बाहेर काढण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक करीत होते.
(प्रतिनिधी)
\नगरसचिवांची पळवापळवी
नगरसचिव मिलिंद वैद्य यांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी पळवून नेले. त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून गटनेतेपदाचे पत्र लिहून घेतल्याचा आरोप सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव यांनी केला आहे. तर सभेच्या आदल्यादिवशी सेनेच्या नगरसेवकांनी वैद्य यांना पळवून नेले होते, असा आरोप कळमकर यांनी केला. ‘नगरसचिवांना एक दिवस तुम्ही पळविले आणि एक दिवस आम्ही पळविले, असे अनिल शिंदे यांनी कळमकर यांना ठासून सांगितले. त्यावरही सभेनंतर बराच गोंधळ झाला. शिंदे यांनी वैद्य यांना पळविल्याची एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे कळमकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Confusion in the Municipal General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.