डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्यासाठी रचला गोळीबाराचा कट; मास्टर माईंड सिराज खानला अटक
By अण्णा नवथर | Published: July 11, 2024 01:21 PM2024-07-11T13:21:06+5:302024-07-11T13:21:28+5:30
राजेंद्र देविदास भाऊ बहुधने यांनी फिर्याद दिली आहे.
अण्णा नवथर, अहमदनगर, लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी गोळीबाराचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मास्टर माईंड सिराज दौलत खान याला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र देविदास भाऊ बहुधने यांनी फिर्याद दिली आहे.
नगरमधील माळीवाडा परिसरातील मशिरा फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या चौकशीतून गोळीबारामागील सत्य समोर आले. आरोपी सिराज खान याने राजेंद्र देविदास बहुधने याला त्याच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये बसून डॉक्टर प्रदीपकुमार तुपेरे यांच्या तारकपूर येथील नवोदय क्लिनिक येथे नेले. त्यानंतर बहुधुनी याला घेऊन तो त्याच्या माळीवाडा येथील मशिरा फिश अँड बर्ड्स च्या दुकानात आला. तिथे त्यांनी डॉक्टरांनाही बोलावून घेतले. तिघांमध्ये चर्चा सुरू असतानाच सिराजाने राजेंद्र बहूधने यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान सिराज याने मुलगा मोइन याला दुकानात असलेले बंदुक आणण्यास सांगितले. मुलगा बंदूक घेऊन आला. सिरजने राजेंद्र बहूधने याला बंदुकीचा धाक दाखवीत जमिनीवर गोळीत झाडली. त्यानंतर त्याच्या हातातील बंदूक त्याने राजेंद्र बहूधने याच्या हातात दिली व डॉक्टर तुपेरे यांना सांगितले, की आता तु राजेंद्र याने माझ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांना सांग नाहीतर तुला धंद्याला लावून टाकीन अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत