महासभेच्या तीन जागांवरून वाद

By admin | Published: July 19, 2016 11:37 PM2016-07-19T23:37:37+5:302016-07-20T00:24:10+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे.

Debate on three seats in the General Assembly | महासभेच्या तीन जागांवरून वाद

महासभेच्या तीन जागांवरून वाद

Next


अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे. महासभेतून ३ सदस्य निवडण्याबाबतचा आक्षेप नोंदवून घ्यावा. तसेच मनपाची खास सभा होण्यापूर्वी प्रभारी आयुक्तांनी पक्षीय संख्याबळ निश्चित करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता खास सभा बोलविली आहे. या सभेत संख्याबळाच्या निश्चितीवरून घोळ होण्याची शक्यता आहे. नव्या संख्याबळ निश्चितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य कमी झाला आहे, तर शिवसेनेचा एक सदस्य वाढला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र कवडे यांनी संख्याबळाबाबत नगरसचिवांशी चर्चा करण्याचे सूचविले होते.
स्थायी समितीमधील राष्ट्रवादीची एक जागा कमी झाल्याने गटनेते संपत बारस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावेळी बारस्कर यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन गवारे यांनी खंडपीठासमोर बाजू मांडली.
महासभेतून ३ सदस्य नियुक्त करण्यास राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. राष्ट्रीय पक्ष असताना महासभेतून सदस्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणीच याचिकेत करण्यात आली आहे. महासभेऐवजी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शिवसेनेच्या कोट्यातून एक सदस्य नियुक्त करावा. महासभेतून नियुक्ती करण्याबाबतचा आक्षेप प्रभारी आयुक्तांनी नोंदवून घ्यावा. त्यानंतर संख्याबळ निश्चित करावे आणि सभा सुरू करावी, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेसच्या गटनेत्या सुवर्णा कोतकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची नावे पाकिटात द्यावीत, असे पत्र नगरसचिवांनी दिल्याचा दावा पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.
कोतकर यांना पत्र दिले, मात्र बारस्कर यांना पत्रच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सदस्य निवडण्याच्या घोळाबाबत आणि कोणते सदस्य स्थायीमध्ये पाठवायचे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षाच्या बैठका मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. सदस्य पदासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
(प्रतिनिधी)
संख्याबळ निश्चितीबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे नगरसचिव मिलिंद वैद्य यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र वैद्य यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होता. त्यामुळे शिवसेनेने नगरसचिवांना गायब केल्याचा विरोधी नगरसेवकांचा आरोप होता. मात्र आमच्याच नगरसचिवांना आम्ही कशाला गायब करू, असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने केला आहे. दरम्यान महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे होता, मात्र जिल्हाधिकारी विदेश दौऱ्यावर जात असल्याने कवडे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वाद आता वालगुडे यांच्यासोबत चांगलाच रंगणार आहे.

Web Title: Debate on three seats in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.