‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
By सुधीर लंके | Published: September 19, 2024 09:38 AM2024-09-19T09:38:34+5:302024-09-19T09:39:50+5:30
जिल्हा बँकांनी ‘वर्क वेल’ या एकाच कंपनीला भरतीचे काम देण्याचा धडाका लावला आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकांच्या नोकर भरतीतील घोटाळे थांबविण्यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन राबविण्याचे धोरण सहकार विभागाने घेतले खरे; पण अनुभवी कंपन्या ‘आम्हाला थेट काम द्या’ अशी भूमिका घेत या निविदा प्रक्रियेत समाविष्ट होण्यासच तयार नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकांनी ‘वर्क वेल’ या एकाच कंपनीला भरतीचे काम देण्याचा धडाका लावला आहे.
सहकार आयुक्तांनी या भरतीसाठी आयबीपीएस, टीसीएस आयओएन, आयटीआय लिमिटेड, बीईसीआयएल, एमकेसीएल व वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, अशा सहा कंपन्यांची तालिका बनवली आहे; पण यापैकी ‘वर्क वेल’ या एकाच कंपनीला यवतमाळ, ठाणे, अहमदनगर, भंडारा, रायगड, सातारा या जिल्हा बँकांनी भरतीचे काम दिले आहे.
नगर जिल्हा बँकेत सातशे पदांची भरती सुरू आहे. या बँकेत ‘आयबीपीएस’ व ‘टीसीएस’ यांनी निविदाच भरली नाही. ‘शासकीय आदेशात आमचे नाव आहे. आमचे दरही आहेत. पुन्हा निविदा कशाला?’ असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. केवळ ‘एमकेसीएल’ व वर्क वेलने निविदा भरली. वर्क वेलची निविदा कमी दराची असल्याने त्यांना भरतीचे काम मिळाले.
वर्क वेल कंपनीचा अनुभव काय?
‘वर्क वेल’ कंपनीच्या अनुभवाबाबत कंपनीचे संचालक प्रफुल्ल शिरभाते यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सहकार आयुक्तांना विचारा’. सहकार आयुक्त दीपक तावरे म्हणाले, ‘मी पदावर येण्यापूर्वी कंपनी पॅनलवर आली. त्यामुळे कागदपत्रे पाहावी लागतील.
‘लोकमत’ने माहिती अधिकारात कागदपत्रे पाहिली असता केवळ दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला २०२३मध्ये पॅनलवर घेतल्याचे दिसून आले. कंपनीचे कार्यालयही पुण्यात दोन खोल्यांत दिसत होते.
भरतीचे शुल्क ७४९, कंपन्यांना दरावरुन नकार
लिपिक पदासाठी आयबीपीएस कंपनी प्रती उमेदवार ७००, तर टीसीएस ६०० रुपये शुल्क आकारते. नगर जिल्हा बँंकेत एमकेसीएलने ६१९, तर वर्क वेलचे ५६०.५० दराची निविदा भरली. बँंकेने स्वस्त दर पाहत वर्क वेलला काम दिले. स्वत: बँंकेने मात्र लिपिकाच्या पदासाठी प्रती उमेदवार ७४९ रुपये शुल्क आकारले आहे.