रडू नका, आता लढायला शिका

By admin | Published: July 20, 2016 11:44 PM2016-07-20T23:44:27+5:302016-07-20T23:49:39+5:30

बाळासाहेब काकडे -कुळधरण मॅडम... छकुली आमची जीवलग मैत्रीण होती, तिच्या आठवणीविना आमचा तासही जात नाही. छकुलीला ज्यांनी हाल हाल करून मारले त्यांचे हात पाय मोडून त्यांना फाशी द्या,

Do not cry, learn to fight now | रडू नका, आता लढायला शिका

रडू नका, आता लढायला शिका

Next

बाळासाहेब काकडे -कुळधरण
मॅडम... छकुली आमची जीवलग मैत्रीण होती, तिच्या आठवणीविना आमचा तासही जात नाही. छकुलीला ज्यांनी हाल हाल करून मारले त्यांचे हात पाय मोडून त्यांना फाशी द्या, अशी भावनिक इच्छा छकुलीच्या मैत्रिणींनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी स्वत:च्या भावनांना आवर घालीत मुलींना सावरले. रडू नका, आता लढायला शिका, असा धीर त्यांनी दिला.
कुळधरण (ता. कर्जत) येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील मुलींशी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी छकुलीची मैत्रीण वृषाली भवाळ हिने आरोपीच्या विरोधात कठोर भूमिका घ्या, अशी मागणी केली. हे सांगत असताना तिने हंबरडाच फोडला. त्यामुळे विद्यालयाचा परिसर भावुक झाला होता.
रश्मी शुक्ला म्हणाल्या, तुम्ही बहादूर मुली आहात. अभ्यासाबरोबरच व्यायाम करा, खूप खेळा. अपप्रवृत्तीच्या विरोधात एकत्र या. तुमच्याकडे कुणाची मान वर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. फक्त स्वत:वर विश्वास ठेवा. तुमचा कोणी छळ केला, कोणी विनाकारण त्रास दिला तर तुम्ही सुरुवातीला आई, वडिलांना सांगा नंतर पोलिसांना कल्पना द्या. आम्ही अशा प्रवृत्तींचा समाचार घेऊन तुम्हाला न्याय मिळेल, असा ठाम विश्वास देते.
मुली, महिलांना तत्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘प्रतिसाद’ नावाने अ‍ॅप विकसित केले. तुम्ही तुमच्या अगर पालकांच्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एक क्लिक करा, तुम्हाला काही तासातच पोलिसांची मदत मिळेल किंवा नगर पोलिसांचा व्हॉटस्अपवर (नंबर ८६०५९११२१३) मेसेज करा, तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल. कुळधरण येथे पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर रश्मी शुक्ला म्हणाल्या हा शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे, परंतु गुरुवारपासून जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी कुळधरणला पोलीस मदत केंद्र सुरू करावे, असे आदेश दिले. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, जि. प. अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रतिभा पाचपुते, सुनीता शिंदे, बाळासाहेब नाहाटा, बापूसाहेब गुंड आदी उपस्थित होते.
मी तुमच्यासारखी होते
मुलींनो मी तुमच्यासारखी सरकारी शाळेत शिकले. त्यावेळी शिक्षण घेताना खूप अडचणी होत्या. तुम्ही भाग्यवान मुली आहात. माझे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मी पोलीस अधिकारी झाले. तुम्हाला पोलीस व्हायचे का ? यावर पन्नास टक्के मुलींनी वर हात केला. शाब्बास, तुम्ही बहादूर आहात. तुमचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ सौरभ त्रिपाठी शिकले म्हणून पोलीस अधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभे आहेत. तुम्ही खूप अभ्यास करा, मोठ्या व्हा, असा विश्वास व्यक्त करुन रश्मी शुक्ला यांनी बालपणातील काही पैलू उलगडले.

Web Title: Do not cry, learn to fight now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.