पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By admin | Published: April 23, 2016 01:04 AM2016-04-23T01:04:39+5:302016-04-23T01:07:24+5:30

अहमदनगर : सावेडीतील नामदेव चौकातून जाणारा मुख्य रस्ता वादामुळे अजूनही डांबरीकरण होण्यास तयार नाही. नित्यसेवा सोसायटीत जाण्यासाठी खडबडीत रस्त्यावरून जावे लागते.

Drinking water | पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

Next

अहमदनगर : सावेडीतील नामदेव चौकातून जाणारा मुख्य रस्ता वादामुळे अजूनही डांबरीकरण होण्यास तयार नाही. नित्यसेवा सोसायटीत जाण्यासाठी खडबडीत रस्त्यावरून जावे लागते. सोसायटीतील दीडशे घरांतील नागरिकांनी पाणी हीच आमची मुख्य समस्या असल्याचे सांगितले. उखडलेले रस्ते डांबरीकरण झाले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी ‘लोकमत’ समोर मांडली.
‘टीम लोकमत’ने शुक्रवारी सावेडीतील नित्यसेवा सोसायटीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. सोसायटीत येणारा एकही रस्ता डांबरीकरण नाही. वसंत टेकडीकडून येणारा रस्ता डांबरीकरण असला तरी ठिकठिकाणी तो उखडलेला आहे. अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण आहे, मात्र मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हे रस्ते झाले होते. अंतर्गत कॉँक्रिटीकरण रस्त्याकडेला असलेल्या गटारीवरील झाकणे ठिकठिकाणी फुटलेली आहेत. पाण्याचा दाब कमी असल्याने बहुतांश घरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. मिळाले तरी ते पाणी गढूळ असते. शेवटच्या घरांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. सोसायटीच्या खुल्या जागेत खेळण्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, या खेळण्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. तुटक्या खेळण्यांवर जीव मुठीत धरून मुले खेळत असतात. कचरा संकलन करणारी घंटागाडी आठवड्यातून एकदा येते. घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिक घरातील कचरा उघड्यावर फेकतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. स्वच्छता करणारे महापालिकेचे कर्मचारी कधीतरी येतात. पथदिवे आहेत.
सोसायटीतील नागरिक एकत्रितपणे सार्वजनिक सण-उत्सव साजरे करतात. एकोपा असला तरी महापालिकेच्या पायाभूत सुविधा मिळण्याकरीता थेट सार्वत्रिक निवडणुकीची वाट पहावी लागते. महापालिकेचा कर नियमितपणे भरतो, मात्र सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
(प्रतिनिधी)
नागरिक म्हणतात.....
कचरा संकलन करणारी महापालिकेची घंटागाडी नियमित येत नाही. घंटागाडी येण्याकरीता स्वच्छता निरीक्षकांना फोन करावा लागतो, त्यानंतर घंटागाडी येते. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सांगूनही रस्ते दुरूस्त होत नाहीत. कसेतरी दिवस काढतो आहे. - संजय चिप्पा

कचरा संकलन करणारी घंटागाडी आठवठ्यातून एकदा येते. नियमित घंटागाडी येत नसल्याने कचरा खुल्या जागेवर टाकला जातो. पिण्याचे पाणी कमी दाबाने येते. पाणी पुरवठा स्वच्छ होत नाही. गत पंधरवाड्यात तर पिण्याच्या पाण्यातून घाण आली होती. - रेणुका अलचेट्टी

पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. कमी दाबाने पाणी येते. पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नागरिक नळाला मोटारी जोडतात. त्यामुळे अनेक घरांना पाणी मिळत नाही. तीन वर्षापूर्वी झालेले रस्ते उखडले असून ते डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
- वंदना दडगे.

अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण असले तरी सोसायटीतील मुख्य रस्ते मात्र खराब झाले आहेत. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पुरेसे मिळत नाही. गटारीची झाकणे फुटलेली आहेत. त्याची दुर्गंधी परिसरात पसरते.
- संगीता आल्हाट

पिण्याचे पाणी येत नाही. कमी दाब असल्याने पुरेसे मिळत नाही. धुण्या-भांड्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा वापर करावा लागतो. कचरा संकलन करणारी घंटागाडी नियमित येत नाही.
- मनिषा तडका.
सोसायटीतील कोणाकडेच खासगी बोअर नाही. सोसायटी स्थापन करतेवेळी तेथे सार्वजनिक विहीर खोदण्यात आली होती. तिचा वापर आजही सुरू आहे. विहिरीशेजारीच पाणी साठवण टाकी आहे. त्या टाकीत विहिरीचे पाणी सोडले जाते. ते पाणी सोसायटीतील नागरिक धुण्या-भांड्यासाठी वापरतात. महापालिकेचे पाणी कमी दाबाने येत असल्याने बहुतांश घरांना पाणी मिळत नाही. ज्यांना पाणी मिळत नाही, ती घरे सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरतात. मात्र ते पिण्यायोग्य नाही.

Web Title: Drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.