जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 10:54 AM2024-07-09T10:54:17+5:302024-07-09T10:54:31+5:30

प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा.

Gram panchayats whose terms have expired in the district will get new caretakers | जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कारभारी

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर - जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायती आणि विविध कारणांनी रिक्त असलेल्या 155 सदस्यांच्या जागांसाठी पुढील महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी तयारी सुरू केली असून आज (मंगळवार) वार्डनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 19 जुलैला वार्डनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करू शकते.  

दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकीत चुकीची प्रभागरचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणामुळे निवडणूका न होवू शकलेल्या राज्यातील सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणार्‍या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सुचना राज्य निवडणूक आयोगाने काढल्या आहेत. 

त्यानूसार नगर जिल्ह्यात 84 ग्रामपंचायत आणि 155 ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 15 जुलैपर्यंत त्यावर हरकती घेण्यास मुदत राहणार असून 19 तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा जानेवारीपासून रिक्त आहेत. यामध्ये काही निधन तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 69 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव 19, संगमनेर 14 आणि नेवासा तालुक्यातील 10 सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 16 मार्च ते 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 6 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू होती. दरम्यान, ही आचारसंहिता सुरू असतानाच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला होता. 

त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, अचानक राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती आणि रिक्त असणर्‍या सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्व तयारी सुरू केल्याने जिल्ह्यात 84 ग्रामपंचायतमध्ये विधानसभे आधी ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील 26, कर्जत 17, अकोले 8, नगर 7, संगमनेर 2, कोपगाव 3, राहाता 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, शेवगाव 5, पाथर्डी 4, जाखमेड 3, श्रीगोंदा 1 आणि पारनेर 1 यांचा समावेश आहे.

Web Title: Gram panchayats whose terms have expired in the district will get new caretakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.