साईंच्या शिर्डीनगरीत मुसळधार पाऊस; लोकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:00 PM2022-09-01T19:00:06+5:302022-09-01T19:00:23+5:30

एकंदरीतच बुधवारच्या पावसामुळे शिर्डी शहरात दाणादाण उडाली आहे. शिर्डीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तू पाण्याखाली गेल्यात तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे

Heavy rain in SaiBaba's Shirdi; Water entered people's houses, life was disrupted | साईंच्या शिर्डीनगरीत मुसळधार पाऊस; लोकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत

साईंच्या शिर्डीनगरीत मुसळधार पाऊस; लोकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

अहमदनगर - एक महिन्याच्या विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीला शिर्डीसह परिसरात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिर्डी शहरातील जनजीवन विस्कळित झाले असून पावसाचे पाणी घरात घुसल्याने लक्ष्मीनगरमधील सुमारे दिडशे कुटुंब रात्रीपासून रस्त्यावर आले आहे. तर नगर मनमाड महामार्गावर पाण्यामुळे वाहतूक कोंडी  झाली आहे. 

यंदाच्या मोसमात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परंतु संपूर्ण श्रावण महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री शिर्डी शहरात विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार सुरुवात केली होती. सतत चार पाच तास सुरू असलेल्या पावसाने शिर्डीत दाणादाण उडवली. सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. नगर मनमाड महामार्गावर कंबरेएवढे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर शहरातील पश्चिम बाजूस असलेल्या उपनगरात नेहमीप्रमाणे लेंडी नाल्याचे पाणी आल्याने पुनमनगर, साईनाथ रुग्णालय, सितानगर, हेडगेवार नगर, लक्ष्मीनगर याठिकाणच्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

निमगाव हद्दीतील श्री साईबाबा महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोठी कसरत करावी लागली. त्याबरोबरच नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस ठाण्यात देखील पाणी साचल्याने अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शासकीय विश्रामगृह देखील पाण्यात आहे. हॉटेल सन एन सॅड कडे जाणारा मार्ग तुर्तास बंद करण्यात आला आहे. एकंदरीतच बुधवारच्या पावसामुळे शिर्डी शहरात दाणादाण उडाली आहे. शिर्डीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तू पाण्याखाली गेल्यात तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तीन ते चार तासांत १२० मिलिमिटर पाऊस झाल्याने डोऱ्हाळे कोराळे नंदुरखी या परिसरातील पावसाचे पाणी शिर्डीकडे वाहिल्याने लेंडी नाला गच्च भरून होऊ लागला. नाल्याची क्षमता मर्यादित असल्याने आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये आणि अन्य शिर्डी परिसरात पाणी घुसले.  

याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवरून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय , शिर्डी नगरपरिषद , ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकारी एकत्रित येत शिर्डीतील साचलेले पाणी काढण्यास ठिकाणी उतरले आहेत.  दोन ते तीन पथक तैनात करून झालेल्या नुकसानीचे पंचनामा देखील केला जात असल्याची माहिती शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

Web Title: Heavy rain in SaiBaba's Shirdi; Water entered people's houses, life was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी