उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:27 PM2018-12-17T12:27:06+5:302018-12-17T12:30:24+5:30
यशकथा : या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला.
- हेमंत आवारी (अहमदनगर)
भारतात पूर्वी ४९ देशी गोवंश जाती होत्या. पैकी सध्या ४० जाती अस्तित्वात आहेत. यातील गीर, काँक्रेज, खिलारी अशा ६४ देशी गावरान गायींचा मुक्त गोठा अकोले तालुक्यातील कोकणेवाडी-धांदरफळ शिवारात एका उच्चशिक्षित तरुणाने तयार केला आहे. यात ८० रुपये लिटर दूध, तीन हजार रुपये किलो गावरान तूप अन् ३० रुपये लिटर ब्रह्ममुहूर्तावर धरलेल्या गोमूत्रातून त्यास चांगला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे.
अकोले-संगमनेर रस्त्यालगत कोकणेवाडी-धांदरफळ शिवारातील शुभम् भास्कर घुले हा तरुण पुण्याच्या ‘फर्ग्युसन’ महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडला. पारंपरिक शेतीला पूरक जोडधंदा गोपालन करण्यासाठी त्याने राज्यातील व गुजरातमधील देशी गायीचे गोठे अभ्यासले. वडिलांच्या मार्गदर्शनाने चुलते सुदाम यांच्या सोबतीने पूर्वीच्या १९ जर्सी गायींच्या गोठ्याच्या आर्थिक कुबड्यांवर त्याने ‘निमाई’ नावाचा गोठा तयार केला. या गोठ्यात फक्त त्याने देशी गायींचा समावेश केला.
जर्सी गायीच्या दुधात ‘हिस्टाडींन’असते, ते मानवी शरीरावर विपरीत परिणाम करू शकते. तर गावरान देशी गायीच्या दुधात ‘प्रोलिटिंग’असते ते आरोग्यवर्धक असते. याचा अभ्यास करून त्याने साधारण ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपयांना एक गाय अशा ६४ गायी गुजरात राज्यातून आणल्या आहेत. ३ लाख रुपये किमतीचा ‘वळू’देखील गोठ्यात आहे. चारा काढणे, चारा घालणे, शेण काढणे, गायींची धार काढणे, गोमूत्र धरणे ही सर्व कामे हातानेच केली जातात. यंत्राने दूध काढले जात नाही.
शुभमने सुरू केलेल्या या गोठ्यामुळे घरातील माणसांसह आजूबाजूच्या २०-२५ लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. गायींच्या कासाच्या आजाराचा प्रश्न असतो. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. मका, गुजरातमधून आणलेला सुका चारा, शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मणी, कडुलिंब व शेवग्याचा पाला, कॅल्शियम वाढीसाठी चुना, असा पोषक चारा गायींना दिला जातो. संस्कृत स्रोत संगीत ऐकवले जाते. यातून गोठ्याची शुद्धता व गोठ्याचे पावित्र्य जपले जाते.
एक गाय साधारण दहा लिटर दूध दोन वेळेला देते. ४.६ ते ५.० दुधाला फॅट मिळते. सध्या १७५ लिटर दूध उत्पादित होत असून, ५० लिटर दूध संगमनेर शहरात विकले जाते. इतर दुधाचे पारंपरिक पद्धतीने तूप बनवले जात आहे. साधारण एक लिटर दूध निर्मितीला ५९ रुपये खर्च येतो. सध्या ८० रुपये लिटर दूध, ३ हजार रुपये किलो तूप, ३० रुपये लिटर गोमूत्र, ३ हजार रुपये टन शेण विकले जाते.
१३ ते १४ वेतानंतर गाय भाकड होते. या गायींच्या सहवासात अर्धा तास राहिले तरी उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. शुद्धता पाळली, तर हा व्यवसाय कधीच तोट्यात जाणार नाही. तूप महाग असले तरी ग्राहकांना तुपासाठी प्रतीक्षा करावी लागते. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसली आणि औषधासाठी तूप हवे असल्यास त्याला पैशांची सक्ती केली जात नाही, असे शुभम घुले यांनी सांगितले.