हेरंब कुलकर्णी यांची एकनाथ शिंदेंनी केली चौकशी; आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 02:53 PM2023-10-09T14:53:05+5:302023-10-09T14:53:38+5:30

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Immediately arrest the assailants who assaulted Heramb Kulkarni; Directed by CM Eknath Shinde | हेरंब कुलकर्णी यांची एकनाथ शिंदेंनी केली चौकशी; आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश

हेरंब कुलकर्णी यांची एकनाथ शिंदेंनी केली चौकशी; आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश

googlenewsNext

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहमदनगर शहरात शिक्षक म्ह्णून कार्यरत असलेले कुलकर्णी आजारी असल्याने शाळेतून घरी येत असताना अज्ञातांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. मारहाणीच्या ४८ तासानंतरही पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णीं यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी केला. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी घटनेची माहिती दिली आहे. 

सदर घटनेची दखल आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. यावेळी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून तब्येतीबद्दल विचारणा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांना आशवस्त केले. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी देखील संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, हेरंब कुलकर्णी हे येथील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते व त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी दुचाकी वाहनावरुन घरी जात होते. त्यावेळी नगर शहरातील रासनेनगर परिसरात  दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. रॉडने हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली. सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांपासून हेरंब कुलकर्णी यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. जमाव जमल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

Web Title: Immediately arrest the assailants who assaulted Heramb Kulkarni; Directed by CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.