राष्ट्रवादी-भाजपची अंतर्गत हातमिळवणी

By admin | Published: April 23, 2016 11:37 PM2016-04-23T23:37:21+5:302016-04-23T23:41:06+5:30

अहमदनगर : राज्यातील युतीच्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेतील विरोधकांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळवित सत्तापक्ष राष्ट्रवादीची कोंडी केली.

Internal collusion under NCP-BJP | राष्ट्रवादी-भाजपची अंतर्गत हातमिळवणी

राष्ट्रवादी-भाजपची अंतर्गत हातमिळवणी

Next

अहमदनगर : राज्यातील युतीच्या सत्तेच्या माध्यमातून महापालिकेतील विरोधकांनी चाळीस कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळवित सत्तापक्ष राष्ट्रवादीची कोंडी केली. मात्र भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्थगिती उठविण्यात सत्ताधारी राष्ट्रवादीने यशस्वी खेळी खेळली. राष्ट्रवादी-भाजपच्या अंतर्गत हातमिळवणीमुळे सेनेत अस्वस्थता वाढली आहे. भाजपचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला हा निधी खर्च करण्याची परवनागी त्याशिवाय मिळूच शकत नाही असे मत सेनेच्या गोटातून व्यक्त करण्यात आले.
महापालिकेत युतीची सत्ता असताना नगर महापालिकेला मूलभूत सोईसुविधेसाठी हा निधी मिळाला होता. महापालिकेत नंतर सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता आली असली तरी जूनमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठीचा डाव सेनेने मांडला आहे. त्यामुळे आपल्याच कार्यकाळात हा निधी मिळावा यासाठी सेनेने चाळीस कोटी रुपये खर्चाला शासनाकडून स्थगिती मिळविली. ही स्थगिती मिळविताना राज्यातील युतीच्या सत्तेचा फायदा झाला.
मात्र ही स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू असे आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची तारीख मागितली. पण ही तारीख मिळालीच नाही. त्यामुळे महापौर कळमकर यांना नाईलाजाने खंडपीठात धाव घ्यावी लागली. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेल्या स्थानिक नेत्याने अखेरचा प्रयत्न म्हणून भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला हाताशी धरले. त्या माध्यमातून अनेकदा मुंबई वाऱ्या झाल्या.
प्रभाग तीनच्या पोटनिवडणुकीत सेनेचे नेते, नगरसेवक गुंतले असताना मंत्रालयात या नेत्याच्या माध्यमातून निधी खर्चाची स्थगिती उठविण्यासाठी कागदपत्रे रंगविण्यात आली. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते मुंबईत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकले अशी चर्चा सेनेच्या गोटातून ऐकावयास मिळते. चाळीस कोटी रुपये निधी खर्चाला मिळालेली स्थगिती त्याशिवाय मिळूच शकत नाही असा दावा सेनेच्या गोटातून केला जात आहे.
(प्रतिनिधी)
जगताप-कळमकर संघर्षासाठी युतीची चाल
महापालिकेत युतीचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांची दादा कळमकर यांनी अनेकदा भेट घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांनाही दादा कळमकर अनेकदा भेटले. राष्ट्रवादीत आमदार जगताप यांच्यानंतर कोणीतरी नेतृत्व पुढे यावे यासाठी युतीच्या नगरसेवकांनी निधीची स्थगिती उठविताना ‘माईल्ड’ भूमिका घेण्याचे मान्य केले. त्यामुळेच कळमकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू शकले. जगताप-कळमकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू व्हावा यासाठीच भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने स्थगिती उठविण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.

Web Title: Internal collusion under NCP-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.